फोंडाघाटमध्ये श्री. राधाकृष्ण मंदिराचा १२०वा अखंड सप्ताह आजपासून प्रारंभ
सात दिवस भजन, दिंडी, पालखी व सांस्कृतिक कार्यक्रमांचा महाउत्सव
फोंडाघाट
येथील बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले श्री. राधाकृष्ण मंदिर हे स्थानिकांचे श्रध्दास्थान आहे. या पवित्र देवस्थानात आजपासून अखंड सप्ताहास प्रारंभ होत असून, हे या सप्ताहाचे १२०वे वर्ष आहे. सकाळी सप्ताह बसवून त्यानंतर सातही प्रहर अखंड भजन, हरिपाठ व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचे आयोजन वैश्य समाज मंडळ करत असून, संपूर्ण बाजारपेठ या निमित्ताने उत्सवमय वातावरणात न्हालेली आहे. मंदिरात श्री राधाकृष्णांसोबतच श्री गणपतीचीही सुबक मूर्ती विराजमान असून, व्यापारी दररोज सकाळी येथे दर्शन घेऊन आपले व्यवहार सुरू करतात.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आर.के. ग्रुप तर्फे सलग तीन दिवस होणारे भजन. यामध्ये दिग्गज भजनकार सहभागी होणार असून, १, २, ३ क्रमांक काढून त्यांना शेवटच्या दिवशी भरघोस बक्षीसे देण्यात येणार आहेत. संपूर्ण सप्ताहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भजन पथकांची व दिंड्यांची रेलचेल असणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांत हळदीकुंकू, डबल बारी, कमानी, फुगड्या, रेकाॅर्ड डान्स स्पर्धा, तसेच श्री. वामनराव पै यांचे भजन व श्री. पारकर यांचे ‘कलावती आई’ भजन, हायस्कुल व बाळगोपाळ मंडळाची दिंडी यांचा समावेश आहे.
सप्ताहाच्या सातव्या दिवशी श्री. राधाकृष्ण मंदिर व श्री. मारुती मंदिराची पालखी एकत्र येते व सोहळ्याची सांगता होते. मारुती मंदिरातही एक दिवसाचा सप्ताह होतो. या ठिकाणचे नियोजन श्री. पटेल मानकरी करत असून, रात्री डबल बारीसह जंगी कार्यक्रमाचे आयोजन होते.
या सप्ताहासाठी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी यथाशक्ती सहकार्य दिले आहे. यंदा सप्ताहाला राज्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे साहेब भेट देणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
