You are currently viewing अबोली इशारा

अबोली इशारा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अबोली इशारा*

 

काळे सावळे जलद

दाटी झाली आकाशात

धरा मी रे आतुरली

दान देई पदरात!!

 

सारे येती जाती ऋतू

पण कधी ना भेटला

तुझी वाट बघतांना

प्राण कंठापाशी आला!!

 

ऊन्ह कडक झेलले

भेगाळून गेली माती

तुझा प्रदीर्घ विरह

दाह काळजा भोवती!!

 

उजाडले माळरान

आसावले प्राणी पक्षी

वृक्ष अबोल ढाळती

पायतळी पर्णराशी !!

 

आता ये रे तू वेगात

देते अबोल इशारा

झर काळ्या मेघातून

शिंप अमृताच्या धारा!!

 

कळो तुला मनातील

माझ्या मनीचे गुपित

गावू दोघेही आपण

चिंब पावसाचे गीत!!

००००००००००००००००००

 

अरूणा दुद्दलवार@✒️

प्रतिक्रिया व्यक्त करा