सावंतवाडी :
पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र एअर अँड फायरआर्म शूटिंग कॉम्पिटिशन २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कणकवली येथील अन्विता अनाजी सावंत हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अन्विताने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अन्विताने प्रभावी कामगिरी करत जिल्ह्याचा मान वाढविला.
या यशामुळे तिची निवड गोवा येथे होणाऱ्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी.डी. मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिपसाठी झाली आहे.
अन्विता सध्या कणकवलीतील सेंट उर्सुला स्कूल, वरवडे येथे शिक्षण घेत असून, सावंतवाडीतील उपरकर शूटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षक नेमबाज उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
तिच्या या यशामध्ये प्रशिक्षक उपरकर यांचे मार्गदर्शन आणि सेंट उर्सुला स्कूलच्या प्राचार्या सिस्टर जान्सी यांचे सहकार्य लाभले आहे. आगामी स्पर्धांसाठी सर्वांनी अन्विताला शुभेच्छा दिल्या आहेत.
