रस्त्यावर आडवे पडलेले शुभेच्छांचे बॅनर अपघाताला आमंत्रण;
सावंतवाडी नगरपरिषदेचे दुर्लक्ष? – रवी जाधव
सावंतवाडी
सध्या वाढदिवस, सत्कार समारंभ, राजकीय पुढाऱ्यांच्या शुभेच्छा यासाठी शहरातील ठिकठिकाणी मोठमोठे फ्लेक्स व बॅनर लावण्याची फॅशन वाढीस लागली आहे. मात्र, हे बॅनर अनेकदा योग्य प्रकारे न लावल्यामुळे तुटून रस्त्यावर आडवे पडतात आणि त्यातून अपघात होण्याची शक्यता निर्माण होते.
अलीकडील काही घटनांमध्ये अशा तुटलेल्या बॅनरमुळे वाहनचालकांचा तोल जाऊन किरकोळ अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात हे फ्लेक्स आणखी धोकादायक ठरू शकतात, कारण पाण्यामुळे ते लवकर सैल होतात व जोराच्या वाऱ्यात उडून रस्त्यावर पडतात.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अशा बॅनरवर कोणतीही कारवाई होत नसल्याने सावंतवाडी नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याने सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असतानाही, अनेक बॅनर अनधिकृतपणे लावले जात आहेत.
सावंतवाडी नगरपरिषद याकडे गांभीर्याने लक्ष देईल का? अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, वेळेत कारवाई करून असे प्रकार रोखणे गरजेचे आहे, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
