You are currently viewing ज्येष्ठा गौरी

ज्येष्ठा गौरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*ज्येष्ठा गौरी*

 

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रींचे आगमन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा( पार्वती व लक्ष्मी) गौराईना आवाहन केले जाते.

 

त्या माहेरवाशीणी आहेत असे मानून त्यानुसार त्यांचे स्वागत होते.

 

नदीवरून पाच किंवा सात खडे आणून त्यांना गौराईच्या रूपात मानतात. काही ठिकाणी

तेरड्याच्या गौरी असतात. नदीवर खडे केव्हाही उपलब्ध असतात, त्याचप्रमाणे पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र तेरडा फोफावलेला असतो. कदाचित त्यामुळेच ज्येष्ठा गौरीच्या रूपात खडे किंवा तेरड्याचा वापर केला जात असावा.

 

सायंकाळी घरातील माहेरवाशिण किंवा मुलगी हातात ही गौराई घेऊन दारात उभी राहते.

तिचे पाय दुध पाण्याने धुऊन व औक्षण करून तिला घरात स्वागत केले जाते. संपूर्ण घरात तिला फिरवताना ती ज्या ज्या दिशेने जाईल त्या मार्गावर लक्ष्मीची कुंकवाची पावले उमटवितात.

गौराई येताना भरपूर धनधान्य समृद्धी घेऊन येते अशी ठाम समज असल्याने तिला घरातील मुख्य गृहिणी विचारते, ” गौरबाई गौरबाई कुठून आलीस? ” मग गौर हातात घेतलेली मुलगी उत्तरते, ” घाटावरून. ” ” घाटावरून काय आणलंस? ” ” धनधान्य, सोनं चांदी, दूध दुभतं, समृद्धी, संपन्नता” असा त्या मायलेकींचा संवाद चालतो.

ती प्रवास करून आली, थकली आहे या कल्पनेने तिला भाजी -भाकरी, शेंगांची आमटी- भात असा साधा नैवेद्य दाखवतात.

 

नुसतेच खडे किंवा तेरडा कसा ठेवायचा?

माहेरवाशिण कशी शोभिवंत, सुरेख दिसली पाहिजे म्हणून बाजारात उपलब्ध असलेले धातूचे किंवा कागदाचे मुखवटे चढवून, दाग- दागिने घालून वरून चांगली भरजरी साडी नेसवून गौराई सजून धजून स्थानापन्न होते.

 

दुसऱ्या दिवशी जेष्ठा नक्षत्रावर गौराईची पूजा होते. तिच्यासाठी मिष्ठांन्न भोजन केले जाते. बहुतेक ठिकाणी पुरणपोळी, सोळा प्रकारच्या भाज्या, चटण्या कोशिंबिरी, कटाची आमटी असा भोजनाचा थाट असतो. दोन दिवसांची माहेरवाशीण तिला काय खाऊ घालु नी काय नको असे होते ना? याचसाठी बहुधा सोळा प्रकारच्या भाज्यांची पद्धत असावी. पूर्वी एकत्र कुटुंबे असायची. एका कुटुंबात वीस/ पंचवीस माणसे सहज असायची. त्यामुळे इतक्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी संपणे अवघड नव्हते. परंतु आजकालच्या चौकोनी कुटुंबात इतक्या भाज्या केल्या तर अन्नाचा विनाकारण नाश व्हायचा. यासाठी बरेच लोक एकच मिक्स भाजी करणे पसंत करतात. काळाप्रमाणे बदलणे आवश्यक आहे.

 

तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी

सासरी परत जाण्यास निघतात. लेक निघाली म्हणून हा दिवस सकाळपासूनच थोडा उदासीन भासतो. मुखवट्यावरचे तेज ओसरल्यासारखे वाटते.

 

गौराई ची पूजा होते. सुवासिनी गौरीच्या नावाचा दोरा घेऊन त्याच्या बेलफळ, काशीफळ,

फुले घेऊन गाठी बांधतात. या दोऱ्याला दोरक असे म्हणतात. हा दोरा गौरीच्या गळ्यात घालून

नंतर सुवासिनी स्वतःच्या गळ्यात घालतात.

संध्याकाळी निघताना सासरी जायला निघालेल्या या माहेरवाशीणीची ओटी भरली जाते. तिला प्रवासात खाण्यासाठी दही-भाताची शिदोरी दिली जाते आणि पुढील वर्षी पुन्हा लवकर ये असे सांगून तिचे जवळच्याच तलावात

किंवा विहिरीत, जशी सोय असेल त्याप्रमाणे विसर्जन केले जाते.

 

गौरीला घेऊन जाण्यासाठी तिचा पती शंकर येतो असे समजून जाण्याच्या दिवशी शंंकराची पूजाही केली जाते. जावयाचा मान ठेवला जातो.

 

हा तीन दिवसांचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडतो. घरात सुबत्ता नांदावी, आपापसातले मतभेद मिटावेत, माणसा माणसातले प्रेम वाढावे हाच या सणावारांचा मुख्य उद्देश असला पाहिजे. कोणत्याही गोष्टीची बैठक अध्यात्मिक असली तर कुळाचार परंपरा, रिती रिवाज माणूस श्रद्धेने पाळतो. रोजच्या कंटाळवाण्या, त्याच त्याच चक्रातून फिरताना

हा बदल फार उत्साहवर्धक ठरतो.

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

०१/०९/२०२५

प्रतिक्रिया व्यक्त करा