You are currently viewing माझे बाप्पा…आठवणी बाप्पाच्या..

माझे बाप्पा…आठवणी बाप्पाच्या..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझे बाप्पा…आठवणी बाप्पाच्या..*

 

आम्ही खेड्यातून आलेले लोक. टिळकांनी सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव सुरू केला

यामागे फार मोठे राजकिय कारण होते हे आम्हाला पुस्तकात वाचून व पेपरमधील गर्जना वाचून माहित होते. कारण आम्ही बालपणापासून पेपरही वाचत होतोच.

ब्रिटिशांची दडपशाही व दहशत भयंकर होतीच

त्यात आमचे मागासलेपणही भयंकर होते. ब्रिटिश, समाजाला तोंड बाहेर काढू देत नव्हते व

आमचा बुरसटलेला रूढीग्रस्त समाज आम्हाला

तोंड बाहेर काढू देत नव्हता अशी भारतीय समाजाची भयंकर कोंडी झाली होती. अहो, जुन्या नाटकांमघ्ये सुद्धा ब्रिटिशांना क्रांतीचा वास

येत असे व पुस्तकांवर बंदीच लादली जात असे. अशा वेळी लोक एकत्र येणार कसे व जनजागृती

होणार कशी?…

 

म्हणून टिळकांनी जाणूनबुजून गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत लोकांना एकत्र

आणण्याचा प्रयत्न केला. कारण धार्मिक बाबतीत समाज हस्तक्षेप खपवून घेत नाही हे

ब्रिटिशांना चांगलेच माहित होते. म्हणून आमच्या

लहानपणी म्हणजे सुमारे साठ-सत्तर वर्षांपूर्वी

शाळांमधून व गावातून काही गणपती बसू लागले. आम्हाला कळत काही नव्हते पण रात्री

झुंडीने जात ती भलीमोठी मुर्ती व तिची झगमगणारी आरास बघत फिरायला मजा वाटत

असे. दहा दिवस गावात नुसती धामधुम असे.

गणपतीचीच हवा असे असेच म्हणू या ना!

वातावरण कसे प्रसन्न मोहक असे, आनंदाचे

वारे वहात असत व रात्रंदिवस तीच चर्चा गावात

चाले. कुणाचा गणपती व सजावट सुंदर आहे?

कुणाची अधिक सरस आहे अशा प्रकारे सानथोर

चर्चा करत असत. आम्ही हायस्कूलची मुले सरांना घाबरत घाबरत गणपती पहात असू.

बायका सुद्धा डोक्यावरील पदर सावरत गणपतीला नमस्कार करायला बाहेर पडत असत. त्या निमित्ताने दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असे व मोठ्या प्रमाणावर गर्दी ते बघत असे. ही एक सामाजिक

चळवळच होती ना?

 

नंतर शिक्षणासाठी बाहेर पडल्यावर या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले तरी नाशिकला १९६९

साली आल्यानंतर पुन्हा लक्ष वेधले गेलेच. नाशिक मधील गणपती सजावट बघण्यासाठी अलोट गर्दी होऊन रात्रभर नाशिक जागेच असे. सुंदर देखावे पाहून लोक जागेवरून हलत नसत.खेडीपाडी सारी नाशिकला धाव घेत खांद्यावर मुलांना बसवत पालक देखावे बघत इतके ते मनोहारी असत. काळ

बदलत होता. जनजागृती होत होती.७३ साली

जेव्हा आम्ही घर बदलले तेव्हा आमच्या शेजारी गणपती बसत असे. माझा मुलगा लहान होता तरी शेजारी आरतीला जात असे. तो मुलांचा घोळका ते वातावरण त्या बालमनाला आवडणे

स्वाभाविक होते. एक दिवस आरती करून आला

व म्हणाला,” आई, आपणही गणपती बसवायचा का?” मी म्हणाले, “ हो बसवू या की”. आणि तेव्हापासून आजतागायत नेमाने गणपती येतो

आहे. मुलगा अगदी खुष झाला. आमच्या घरीही

मुले आरतीला यायला लागली. खाऊ प्रसाद मिळू

लागला. न कळत मनावर आरत्या गाणी अथर्वशीर्षाचे संस्कार होऊन पाठांतर स्पर्धेत

बक्षिसही मिळू लागले. घरात आनंद चैतन्य खेळू

लागले ते आजपर्यंत ती प्रथा चालूच आहे.

 

आता तर, नातवंडे ठरवतात तो गणपती घरात

यायला लागला.त्यांच्या पसंतीचा, रंगाचा प्रसन्न

असा मोठ्या आकाराचा गणपती घरात येतो.

सुंदर मखर, रोषणाईने घर कसे चैतन्याने भरून

जाते. मुले घंटी कोण वाजवणार म्हणून भांडतात.

भरपूर मोदक प्रसाद खातात ते बघण्यात सुद्धा

सुख असते.

 

ह्या वर्षी पण… आमचा मानस IIT मुंबईला गेल्यामुळे नवा मोठा बाप्पा आणलाच नाही.

सुनबाई नि नातं दरवर्षीच एक छोटा गणपती

शाडूची माती आणून बनवतात. त्याचीच आम्ही

स्थापना केली. मानस मुंबईला गेल्यापासून घर

सुने सुने झाले आहे. बाप्पाच्याच कृपेने मानस

मुंबई पवईला गेला आहे, याचा खूप मोठा आनंद

आहे.या नसण्याचीही सवय होतेच हळूहळू.

एक चिमणी आहे चिवचिवायला, ती चिवचिवत

असते सतत.थोडीफार पोकळी भरून निघते मग.

आता दहा दिवस बाप्पा आहेत घरात, मग पुन्हा

एकदा घर सुने सुने होईल. चालायचेच…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा