*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बंध नात्याचे…*
बंधन मनामनांचे असतो प्राण तयात
भाऊ बहिण नाते नंबर एक यात
जुळतात बंध नात्यांचे बालपणापासून
करते बहिण सारे साजरे सारे हासून..
गुंततो प्राण भावात भुमिकाच जणू आईची
पदोपदी ती लागे दादास मदत ताईची
होऊन कडेवर स्वार मिरवितो जिथेतिथे हा
जडभार कधी ना होतो हा पंचप्राण ताईचा..
मिळताच खाऊ ताईस तो बाळमुखातच जाई
इतका कसा तो जीव जणू बनते ती प्रतिआई
हे असे बंध सुकुमार फुलती,कळी कळी ती
रुजतात घट्ट इतके विझवू कधी न विझती..
निघताच सासरी ती जणू उजाड होती राने
मन घट्ट करून भावाने मग निरोप द्यावा त्याने
हे बंध रेशमाचे मलमली तलम राखीचे
सौहार्द खोल मनात असते बहिणभावाचे..
जणू प्राण एक, शरीरात दोन त्या वसती
हे महानमंगल स्तोत्र नात्याची आहे महती
विश्वास असावा धागा जो कधी कधी ना तुटतो
घेताच काळ कसोटी नात्यावर खरा उतरतो…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

