You are currently viewing ‘वेदना आणि दुःख म्हणजे आपले सगेसोयरेच ना!’

‘वेदना आणि दुःख म्हणजे आपले सगेसोयरेच ना!’

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

*’वेदना आणि दुःख म्हणजे आपले सगेसोयरेच ना!’*

सुख दुःख हे नाण्याच्या दोन बाजू आहेत सुखा मागून दुःख येणारच असतं तेव्हा सुखाने हरळून व दुःखाने खचून न‌ जाता त्यातून स्वतःला कसे सावरता येईल व कसा मार्ग काढता येईल याचा विचार करावा.जन्माला आल्यावर माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पावलोपावली लढावं लागतं.प्रत्येक लढाई जिंकूच असं नाही मात्र कधी कधी पराभव सुध्दा स्विकारावा लागतो पण त्या पराभवातही सुख शोधता आले म्हणजे हारून ही जिंकल्याचा आनंद होतो.काहींच्या वाटेला दुःखाच्या वेदना इतक्या काही तिव्र असतात की ते स्वतःला संपवण्याचा विचार करता. दु:ख वेदना पाहून चार पावलं मागे सरकण्यापेक्षा त्या वेदनेला,दुःखाला कसं परतून लावायच यासाठी लढणे अपेक्षित आहे.कधी कधी आपल्या आयुष्यात काय घडेल याचा अंदाज लावता येत नाही.क्षणाक्षणाला जगण्याची दिशा बदलते,तेव्हा वादळासारख येणार दुःख तेव्हढ्याच ताकदीने त्याचा सामाना करण्याचं सामर्थ्य आपल्यात असायला हवं.कोणी आपल दुःख स्विकारणार नाही किंवा त्याच्या जवळच सुख उसनवार देणार नाही.जे काही करायचं ते स्वतःलाच कराव‌ं लागतं.तेव्हा जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेदना आणि दुःख :हे असतंच कोणी कितीही श्रीमंत असला किंवा सर्वसामान्य,सर्वसाधारण,मध्यमवर्गीय असला तथा विमानात फिरणारा बिएमडबल्यूत फिरणारा, पायी चालणारा कोणीही असुदे वेदना आणि दुःख त्याच्या वाटेला नाहीच असं कधी होत नाही.कितीही सुखासुखी आयुष्य असल तरी दुःख आणि वेदना ह्या चुकत नसतात. कारण वेदना आणि दुःख प्रत्येकाच्या जीवनातील सत्य आहे किंवा वास्तविकता समजा तेव्हा ते टाळता येत नाही. दुःख केव्हाही कोणत्याही वेळेला येऊ शकते दुःख येण्याला किंबहुना वेदना व्हायला वेळकाळच बंधन नसतं.उलट सुख मिळवण्यासाठी,सुखाचे क्षण उपभोगण्यासाठी वाट पहावी लागते पण दुःखाला कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही.चालता बोलता पडझड होते इजा होते आणि मग वेदनेने गहिवरून जातो.सुखाच्या बाबतीत तसं होत नाही म्हणून दिवसागणिक येणाऱ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी सुख भोगले पाहिजे म्हणजे दुःख जरी असल तरी त्याचा विसरपडून चेहऱ्यावर हसू फुलते.
जीवन म्हणजे एक प्रवास आहे कधी सुखाचा,कधी संघर्षांचा.या प्रवासात प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्यातरी टप्प्यावर वेदना आणि दुःख यांचा सामना करावा लागतो.ही वेदना शारीरिक असो वा मानसिक, दुःख हे तात्कालिक असो वा खोलवर त्याची झळ सोसावीच लागते. वेदना ही केवळ शरीरात होणारी जखम नाही तर ती मनाच्या खोल कप्प्यांत खोलवर रुजलेली मुक भावना असते. कधी एखाद्य शब्दाने,कधी एखाद्या आठवणीने,तर कधी एखाद्या अपूर्ण स्वप्नाने वेदना जन्म घेते. मनासारखं होत नाही,पाहिजे ते मिळतं नाही, अशा कितीतरी घटना घडत असतात त्यामुळे दुःख आणि वेदनांचा सामना करावा लागतो पण वेदना एकप्रकारे आपल्याला स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि जगाबद्दल विचार करायला लावते.तसेच दुःखच्या बाबतीतही असंच म्हणता येईल की आपल्या अवतीभोवती खूप हसरे चेहरे दिसतात पण त्यांच्या मनातल दुःख दिसतं नाही.दुःख ही एक अशी अनुभूती आहे ज्याचे स्वरूप प्रत्येकासाठी वेगळे असते.काहींसाठी ते प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख असते, काहींसाठी अपयशाचे,तर काहींसाठी एकटेपणाचे.काहींचे दुःख इतके गहिरे असते की शब्द अपुरे पडतात,आणि काहींचे दुःख इतके रोजचे असते की तेच आपल्या अवतीभोवतीच घुटमळत असतात.तेव्हा वरवर हसऱ्या चेहऱ्यांच्या मागे किती दुःख किती वेदना,यातना असतात हे लक्षात येतं नाही.खरतर दुःख किंवा वेदना असल्याशिवाय माणसाला माणूस कळत नाही आयुष्य म्हणजे काय हे कळत नाही जगणं कळतं नाही.आयुष्याचा सारीपाट समजून घेण्यासाठी दुःखासोबत वेदनाही असायला हव्यात कारण दुःख आपल्याला जगण्याचं बळ देत,दुःख आपल्याला संयम शिकवते सहनशीलतेचा अर्थ सांगते आणि आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवते.सुखाच्या काळात माणूस कधीच स्वतःकडे खोलवर पाहत नाही, पण दुःखात तो स्वतःला नव्याने ओळखायला लागतो दुःखात वाढलेली माणसे अधिक संवेदनशील, सहृदय आणि समजूतदार असतात हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. ज्याने दुःख समजून घेतले आणि ज्याला वेदना कळते अशी माणसं सुखात किंवा सुख आल्यावर हरळून जात नाही, भारावून जात नाही समयसूचकता पारखून त्या सुखाचा आनंद घेतात दुःख म्हणजे काय हे त्याला माहीत असतं म्हणून दुःख भोगलेल्या व्यक्तींना सुखा आल्याचं फारस कौतुक नसतं.तेव्हा सुखासाठी दुःख, वेदनेपासुन दुर पळण्याऐवजी ते समजून घ्यायला हवं.अनेकदा आपण वेदना टाळण्याचा प्रयत्न करतो,दुःख झटकून टाकायचा,विसरून जायचा किंवा दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो पण वेदना टाळली की ती अधिक तीव्र होते.उलट तिचा स्वीकार केल्यास ती वेदना आपल्याला अधिक मजबूत करते.इतिहासातील अनेक महान कलाकार,कवी,लेखक आणि संगीतकार यांनी आपल्या वेदनांमधून कलाकृती घडवल्या आहेत. दुःखातून जन्मलेली कविता,एका तुटलेल्या मनातून उमटलेली रचना ही अनेकांना आधार देते.आपली वेदना जर आपण रचनात्मक मार्गाने व्यक्त केली,तर ती इतरांसाठी प्रेरणादायक ठरते दु:खातून अंतरमानातील अनेक भाव माणसांच्या आयुष्यातील सत्यता दुःखातून व्यक्त होते.तेव्हा दुःख आल्याने खचून न जाता त्यांना समजून घ्यायला हवं.कारण वेदना आणि दुःख यांच्याशी सामना करताना ‘प्रतिक्षा’ हे महत्त्वाचे शस्त्र आहे.दुःख आणि वेदनेचा खेळ उन सावली सारखा असला तरी त्यातून धैर्याने मार्ग काढण्याचं मनोबल आपल्यात असलं पाहीजे.जसे की उन गेल्यावर सावली येतेच तसंच प्रत्येक वेदने मागे एक आशेचा किरण लपलेला असतो. काहीच थांबत नाही दुःखा नंतर सुख येणारच असतं ही वेळ सुद्धा जाईल हा ठाम विश्वास जर असेल तर वेदना आणि दुःखाची तिव्रता आपोआप कमी होते.स्वतःशी प्रामाणिक राहून दुःखाचा स्वीकार करणे हे खरे साहस आहे.स्वीकार केल्यावरच उपचाराची प्रक्रिया सुरू होते.वेदना आणि दुःख ही नकारात्मक गोष्टी नाहीच.त्या आपल्या जीवनातला एक भाग आहे त्यातून आपण शिकतो,वाढतो आणि मोठं होतो.कधी एकटं बसून आपल्या वेदनेला शब्द द्या,चित्र द्या, सूर द्या.ती तुमची ताकद बनून उभारी देईल.
“दुःख हे टोकाचं असतं, पण त्याचं अंतर पार केल्यावर आत्माविश्वास सापडतो.
काही काही माणसं एव्हढे कष्टाळू असतात की त्यांच्या वाटेवरचे परिश्रम संपतच नाही सतत धावपळ करून काम करत राहतात,अनेक अडचणी येतात अनेक संकटाना सामोरे जाऊन दुःख वेदना सहन‌ करून‌ ते मार्ग काढत असतात तरी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष काही कमी होत नाही.कसा कमी होईल.ज्याला कष्टाची सवय असते अशा माणसांना ‌सुखाची आठवण येत नाही किंवा सुखाच्या मागे धावत नाही आहे त्या परिस्थितीतही ते सुखात असतात आनंदात रहातात कसलीच अपेक्षा न बाळगता जगण्यासाठी परिश्रमाच्या वाटेवर धावत असतात.दुःख,वेदना पावलोपावली असतानाही सुखाची वाट बघत नाही कारण त्यांना माहित असतं की दुखानांतर सुख हे येणार आहे मग जे आज आपल्या जवळ नाही त्याच्यासाठी जिवाची घालमेल करण्यापेक्षा जे आहे ते स्विकारून त्याच्यातच जगण्याचा आनंद समजतात.काय असतं की कधी केव्हा माणसांच्या आयुष्यात अकस्मात असं काही घडत की सुखाच्या राशी त्यांच्या पायाशी लोळण घालतं.एका रात्रीतून काहीही घडू शकतं म्हणून वेळ वाईट असली तरी थांबायचं नाही खचायच नाही. वेळ काळ बदलत असतो.फक्त आपल्याकडे सय्यम असला पाहिजे.सुख दुःख काही असलं तरी वेळेनुसार आयुष्यात होणारे बदलत स्विकारायला हवेत.चांगल्या वाईट घटनेचे अनुभवच यशाच्या वाटा मोकळ्या करून देतात.दुःख,वेदना,यातना,ज्या माणसात स्विकारण्याची क्षमता असते अशी माणसं कधीच घाबरत नाही. आता सुख दुःख वेदना या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात म्हणून काय जगणं सोडून द्यायचं नसतं.येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जा.न डगमगता त्या कठीण वेळेचा सामना केल्याशिवाय कुठलीच अडचण येत नाही.शेवटी काय तर ज्याचा स्वतावर विश्वास असतो तो कितीही संकट आले तरी त्याचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही.आयुष्य म्हणजे एक खेळ आहे आणि खेळ खेळला पाहिजे.या जगण्या मरण्याच्या प्रवासात सुख,दुःख,वेदना,यातना, संकटे,अडचणी असे अनेक प्रवासी येतात पण यांच्याशी जो लढायला शिकला तो आयुष्य कुठल्याही पराभवाने खचतं नाही..कारण वेदना आणि दुःख म्हणजे आपले सगेसोयरे असतात ते येतील आणि जातील ही.

*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा