*जुगार अड्ड्यावर स्वतः पालकमंत्री नितेश राणे यांना धाड घालावी लागणे हे मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री नितेश राणे यांचेच अपयश
– सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख*
पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे मटका जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांचे अपयश म्हणजेच पर्यायाने गृहखात्याचे अपयश अधोरेखित केले.गृहखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गृहखाते हे अपयशी ठरले आहे असा आरोप काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष करत होते तेच आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिध्द करून दाखविले त्या बद्ल मी पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन करतो असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.
परंतू नितेश राणे पालकमंत्री झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही अशी घोषणा केली होती. पालकमंत्री हे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख असतात. मग त्यांनी आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात अवैध धंदे सूरूच कसे राहातात? याचा अर्थ पालकमंत्री नितेश राणे यांचा प्रशासनावर अंकुश नाही त्यांचे कोणी ऐकत नाही असा याचा अर्थ होतो. नितेश राणे यांनी मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून आपण काहीतरी करत आहे असे जनतेला दाखवण्याचा आपली इमेज चमकवण्याचा प्रयत्न केला. परंतू आजही जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे राजरोस सूरू आहेत.
गेल्या सहा महिन्यात अनेक ठिकाणी दारूबंदी विभागाने छापे मारले आहेत पण पकडलेली दारू किरकोळ स्वरूपाची आहे. हे फक्त आम्ही कारवाई करत आहोत असे दाखवण्याचे नाटक असते.
जिल्ह्यातील काही भागात गांजाच्या शेतीची दोन-तीन प्रकरणे उजेडात आली आहेत पण तपास पूर्ण झालेला नाही. वाळू माफिया रोज नदीपात्रातून अवैध वाळू काढत आहेत. कधीतरी थातूरमातूर कारवाई होते. लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी अवैध काम सुरूच असते.
मटका-जुगाराचे जाळे गावोगावी पसरलेले आहे हे स्थानिकांना ठाऊक आहे पण पोलिसांना दिसत नाही. सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणाशिवाय हे शक्य आहे का?अवैध दारू, मटका, गांजा, वाळू यामध्ये लाखोंचं नव्हे तर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.एवढे मोठे साम्राज्य सत्ताधाऱ्यांचा आश्रयाशिवाय तर शक्यच नाही.गावोगावी सर्वांना माहिती असते की अवैध धंदा कुठे चालतो. या अवैध धंद्यातील पैसे निवडणुकीच्या वेळी मते खरेदी करण्यासाठी वापरले जातात. मागील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत याचा अनुभव सिंधुदुर्ग वासीयांना आला आहे. जिल्ह्यातील बेरोजगार तरुण आज दारू विक्रेत्याचे हप्ते वसूल करणारे, वाळू माफियांचे गाडीवाले किंवा मटका एजंट बनतात. सहज पैसा त्यातून व्यसन, गुन्हेगारी आणि पुढे उद्ध्वस्त आयुष्य. यातून पूर्ण पिढीच बरबाद होत आहे.गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात दारू विषबाधेमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक तरुण गांजाच्या नशेत पकडले गेले आहेत. यामुळे उद्याची संपूर्ण पिढी नष्ट होणार आहे.
या अवैध धंदे करणारे बहुतांश सत्ताधारी पक्षातीलच आहेत. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्टंटबाजी न करता सिंधुदुर्ग जिल्हा अवैधधंदेमुक्त करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अवैधधंदेमुक्त केला तर आम्ही काँग्रेस मार्फत त्यांचा जाहीर सत्कार करू असेही इर्शाद शेख म्हणाले.

