*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
घुंगराची गाडी आली…
गाडी घुंगराची आली माझ्या माहेराची
गाडी घुंगराची आली माझ्या माहेराची..
माया किती माझ्यावर भाऊरायाची…
पडदा गाडीला हो किनखापी मलमलीचा
चढायला ठेवला मला मखमली गालीचा
काटा नको टोचायला काळजी बहिणीची
गाडी घुंगराची…
सर्जा गर्जा धावतात चाल ती दुडकी
हळूच मी बघते हो उघडून खिडकी
ज्वारी बाजरीचं शेते हिरव्या पदराची..
गाडी घुंगराची…
हेरमळा वाजे चाक कुई कुई कुई
भाचे म्हणतील आता आली माझी फुई
घाई घाई घेऊन मी काकवी मळ्याची..
चाखतील पोळीसवे जात लेकरांची…
अलाबला घेईल ती वहिनी माझी गोड
रसरसली आहे जणू आंब्याची ती फोड
सरबराई कराया धावते वन्सची
जागा जणू घेतलीया तिनं हो आईची.
घुंगराची गाडी आली माझ्या माहेराची…
पाहताच भावाला मी हासते खळाखळा
उभ्या उभ्या पिकतो हो हास्याचा तो मळा
सर नाही माहेराला दुज्या त्या गावाची..
घुंगराची गाडी आली…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
