You are currently viewing “वेल डन नितेशजी,बट…..??

“वेल डन नितेशजी,बट…..??

“वेल डन नितेशजी,बट…..?? ”
..ॲड.नकुल पार्सॅकर..

काल सायंकाळी साडेचार वाजता मी सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या शांतता समितीच्या बैठकीत, बैठकीला उपस्थित असलेल्या मा.अपर पोलीस अधीक्षक साटम मॅडम यांच्या उपस्थितीत अवैध धंद्यावर कडक कारवाई करा अशी मागणी करत होतो त्याचवेळी आपले सिंधुदुर्गचे मा. पालकमंत्री कणकवली येथे भर बाजारपेठत दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या मटका बुकींवर “आॅपरेशन अचानक” करत होते. नितेशजी राणे यांची कालची कारवाई पाहून माझ्या सारख्या सजग नागरिकांला थोडासा सुखद धक्का बसला. पालकमंत्र्यांनी हा जो अचानक दे दणादणचा पवित्रा घेऊन जिल्ह्याच्या शुध्दीकरणाची मोहीम सुरू केलेली आहे, याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!
मा. नितेशजी आपण जेव्हा पालकमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर साधारणपणे चार ते पाच वेळा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली भेट झाली. तेव्हा आपण मला व्यक्तीशः सांगितले की” पार्सेकरजी, आपल्याला या जिल्ह्यातील युवकांना योग्य दिशा देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी या युवा शक्तीचा सदुपयोग करून घ्यायला पाहिजे. यासाठी तुमच्या सारख्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ” अर्थात आपण अशाप्रकारे संवाद माझ्याशी साधलात हा तुमच्या मनाचा मोठेपणा. तुमच्या सारख्या महाराष्ट्र स्तरावर प्रभावी काम करणाऱ्या मा. नारायणराव राणे अर्थात आमच्या दादांच्या सुपूञाना मी बापडा काय मार्गदर्शन करणार? आपण घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेचे कौतुक करणारी मी एक पोस्ट लिहिली, त्यावर नेहमीप्रमाणे माझ्या या पोस्टवर काही जणांनी शेरेबाजी केली की, आपल्या कडून काही तरी लाभ झाल्याने मी तुमचे कौतुक केले… वगैरे.
पालकमंत्री झाल्यावर आपण या जिल्ह्यातील मटका, जुगार, चोरटी दारू, अमली पदार्थ, वाळू चोरी अशा वर्षानुवर्षे राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याची घोषणा केलीत. सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आपल्या भाषेत कडक तंबी दिलीत.. आणि आपली प्रामाणिक इच्छा व्यक्त केलीत. या अशा अनैतिक धंद्यामुळे बदनाम होत असलेला आपला जिल्हा आणि बरबाद होत असलेली आपली तरूण पिढी, वाढती व्यसनाधीनता यांना थोडासा दिलासा मिळेल असा आशावाद या जिल्ह्यातील संस्कृत जनतेला वाटू लागले… पण आपल्या घोषणेनुसार काहीच घडत नव्हते म्हणून आपणही प्रशासनावर नाराज होता. सर्व अनैतिक धंदे खुलेआम सुरू होते.हप्ते वाढवण्यासाठी हे सर्व सुरू आहे अशी जोरदार चर्चा सुरू होती ज्याचा स्पष्ट उहापोह आपण आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत घेतलात… तरीही आपण शांत होता.. आणि काल आपण अचानक अॅक्शन मोडवर येऊन केलेली कारवाई खरोखरच कौतुकास्पद आहे.
होय या जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक समस्या यांच्या मुळाशी हे अनैतिक धंदेचं आहे. चौदा पंधरा वर्षाची मुले ही अमली पदार्थाच्या आहारी गेलेली आहेत. ग्रामीण भागातील सुंदर मुलीं काही धनदांडग्यांच्या प्रलोभनाला बळी पडून चुकीच्या दिशेने जात आहेत. चोरट्या दारूची खुलेआम विक्री गल्ली बोळात केली जात आहे. महसूल यंञणेला हाताशी धरून गोर गरीब लोकांच्या जमीनी बळकावण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. गेल्या वर्षी एका सिमेवर लढणाऱ्या सैनिकाची जमीन हडप केल्याची बातमी एका वृत्तपत्राने छापली होती.
हाताला काम नसलेली तरुण पिढी भरकटत आहे अशावेळी रोजगाराभिमुख चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. आपली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अहोरात्र कष्ट घेण्याची तयारी यामुळे आपणास हे सहज शक्य आहे. कालची धाड आणि थेट कारवाई ही क्षणिक न राहता यात सातत्य असणे आवश्यक आहे. तुमच्या सडेतोड देहबोलीतून निदान मला तरी हे जाणवले की या निसर्गसंपन्न सुंदर जिल्ह्याचे तरूण तडफदार पालकमंत्री म्हणून तुम्ही निश्चितच या जिल्ह्यातील संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध आहात. मात्र या निमित्ताने मला आपणास तुमचा एक हितचिंतक म्हणून ही पण विनंती करायची आहे.. अशा धंद्यात गुंतलेले प्रत्येकजण हा गुन्हेगारच आहे. गुन्हेगाराला जात, धर्म, पंथ किंवा पक्षही नसतो. त्याचा पक्ष असतो गुन्हेगारी. अशा अनैतिक धंद्यावर नि:पक्षपणे कठोर कारवाई झाली पाहिजे.
ज्या मटका या जुगारावर आपण धाड टाकलीत याची लागण आता ग्रामीण भागातील काही महिलांना पण झालेली आहे.. आणि हे फारच भयंकर आहे. आपले कुटुंब आणि घर सांभाळणारी ही आपली महिला भगिनी असते.. जेव्हा तीचे पाऊल क्षणिक मोहासाठी अशा दिशेने पडत असेल तर कौटुंबिक व्यवस्थेवर फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आपणास पहावयास मिळतील.
नितेशजी, आपण जो संकल्प केलेला आहे या संकल्पाचे या जिल्ह्यातील एक सजग सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनापासून स्वागत करतो. यासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे. पुन्हा एकदा आपले अभिनंदन!

प्रतिक्रिया व्यक्त करा