कणकवली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (ता.७) सिंधुदुर्ग दौर्यावर येत आहेत. त्यांच्या दौर्यानंतर राज्यात सत्तांतराची प्रक्रिया सुरू होईल आणि लवकरच भाजपचं सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी आज व्यक्त केला. राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्री एकमेकांच्या मतदारसंघातील विकासकामे अडवत आहेत. त्यामुळे राज्याची विकास प्रक्रिया ठप्प झाल्याचेही ते म्हणाले.
येथील भाजप कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. त्यांच्यासोबत भाजपचे चंद्रहास सावंत, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.
श्री.जठार म्हणाले, राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही. तीनही पक्षातील मंत्री एकमेकांच्या मतदारसंघातील विकासकामे अडवून ठेवत आहेत. आडाळी येथे वनस्पती संशोधन प्रकल्प मंजूर झाला. पण याचे श्रेय शिवसेनेला मिळेल म्हणून काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या प्रकल्पाला खो घातला आहे. नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची मंडळी आग्रही आहेत. मात्र नाक कापले जाईल या भीतीने शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध सुरू ठेवला आहे. काँग्रेसचे नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज माफी देणार असल्याची भूमिका घेतली. मात्र वीज माफीचे श्रेय काँग्रेसकडे जाईल म्हणून अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याला विरोध केला आहे. राज्यातील पेट्रोलवरील कर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. मात्र अजित पवार पेट्रोलवरील टॅक्स कमी करण्याला विरोध करत आहेत.
जठार म्हणाले, सर्वच विकासकामांच्या बाबतीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी पक्षाची मंडळी एकमेकांना खो देण्याचे काम करत असल्याने राज्यातील शिवसेना पक्षाचे आमदार कंटाळले आहेत. नोकरशहा मंडळीही सरकारच्या कारभाराला वैतागली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच सत्तांतर होईल आणि भाजपचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही.