You are currently viewing जगाच्या पोशिंद्याचा मित्र

जगाच्या पोशिंद्याचा मित्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रकाश क्षीरसागर लिखित अप्रतिम लेख*

 

*जगाच्या पोशिंद्याचा मित्र*

 

महाराष्ट्र आणि देशभर शेतकऱ्यांचा सर्वश्रेष्ठ मित्र कोण असेल तर तो म्हणजे बैल. पूर्वीच्या काळी शेतीची सर्व कामे बैलच करीत. आता एकविसाव्या शतकात जरी यंत्राने शेतीची बहुतेक कामे होत असली तरी शेतकऱ्यांचा खरा मित्र हा बैलच असतो. आता त्याचा उपयोग काही लोक मांस (बीफ) खाण्यासाठी करतात, ही गोष्ट अलहिदा. म्हणजे लोकांची भूक भागविण्याचे कामही तो करतो. अगदी हयातभर व मरणानंतरही.

एकदा का शेतातून गाडीला बैल जुंपले की शेतकऱ्याच्या निवासस्थानापर्यंत तो अगदी आरामात त्याला नेऊन सोडत असे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्याने त्याला प्रेम द्यावे हीच अपेक्षा असे. शेतीसाठी बहुउपयोगी असा हा बैल. शेतीची मशागत असू द्या किंवा शेतमाल घरी किंवा बाजारात न्यायचा असो. हा बैल अतिशय प्रामाणिक, विश्वासू असा सहकारी असे. पूर्वीच्या काळी म्हणजे विद्युत पंप येण्याआधी बैलच मोट ओढून पाणी काढत. आणि पिकांना पाणी देत.

त्याचे मल मूत्र खत म्हणून उपयोगी असे, आता शेतात कृत्रिम व रासायनिक खते घालून शेतकऱ्याने शेतीची दुर्दशा केली आहे ती गोष्ट वेगळी.

बैल अत्यंत कष्टाळू असत. शेतकरी त्यांना चाबकाने फोडून काढी तरीदेखील बैल शेतकऱ्याशी एकनिष्ठ असत. वर्षभर हा मूक प्राणी आपले काम अतिशय चोखपणे करीत असे. आता पूर्वीसारखे खंडी खंडी धान्यही पिकत नाही की ते साठवून ठेवण्याचा प्रश्न येतो. शेतकरी माल पिशवीतून घरी आणतो. अगदी हूं की चूं न करता शेतकऱ्याची सर्व कामे बिनोबोभाट करणारा हा प्राणी. शेतकऱ्याला लळा लावतो. त्या बदल्यात त्याची मागणी काय तर पोटभर हिरवा चारा. आणि थोडासा खुराक. गाय दूध देते. त्या दुधावर शेतकऱ्याची मुले बाळे पोसतात. वर्षातून फक्त एकदा त्याची सेवा करायची. बैल पोळ्याला त्याचा लाड करायचा. पोळ्याच्या आधल्या दिवशी खांदे मळणी करायची. वर्षभर त्याच्या मानेवर जू ठेवून तेथ घट्टे पडतात.त्याला लोणी व हळद लावून त्याची मालिश करायची. तेवढीच त्याला विश्रांती. त्याच्या शिंगात कडबोळी घालायची. बेगडं लावायची. रंगीत ठसे उमटवायचे. गावच्या मारुती मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायची वाजत गाजत घरी आणायचे. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. अगदी अल्पसमाधानी. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला की झालं त्याचं समाधान.

पण आता शेतकऱ्यांच्या समाधानात आनंद मानणारा हा मित्र दुरापास्त होत चालला आहे. त्याच्या पैदाशीक़डं लक्ष द्यायला हवं आहे शेतकऱ्यांनी.

 

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

९०११०८२२९९

प्रतिक्रिया व्यक्त करा