सावंतवाडी:
अक्षरांची ओळख, रेषांची जोड आणि सुंदर हस्ताक्षराच्या कलेतून गोव्याच्या चिमुकल्या दक्ष क्षितिज परबने थेट राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. विझ इंटरनॅशनल स्पेल बी अँड रायटिंग विझर्ड आयोजित राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत तब्बल ३ लाख स्पर्धकांमध्ये बाजी मारत दक्षने सातवा क्रमांक पटकावला.
फक्त १ ली इयत्तेत शिकणाऱ्या दक्षने दाखवलेली मेहनत, आत्मविश्वास आणि लिखाणकलेवरचे प्रेम हे त्याच्या यशामागचे प्रमुख घटक ठरले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षचा यशाबद्दल त्याचा गोवा सचिवालयात गौरव सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दक्षचे मनःपूर्वक कौतुक करीत भविष्यात तो आणखी मोठे यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.
सावंतवाडीतील ॲड. क्षितिज परब व अनुराधा परब यांचा सुपुत्र तसेच ॲड. प्रकाश परब व कवयित्री सौ. उषा परब यांचा नातू असलेला दक्ष हा केवळ कुटुंबापुरता अभिमान न राहता संपूर्ण गोवा आणि सिंधुदुर्गाचा अभिमान ठरला आहे.
गोमंतकाच्या भूमीतून उमललेला हा अक्षरांचा लहानसा फुलोरा आता संपूर्ण देशभर सुगंध दरवळवतो आहे. दक्षचे यश संपूर्ण गोवा व सिंधुदुर्गासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
