नानेली येथे भात पिक शेतीशाळेचे यशस्वी आयोजन
नानेली
क्रॉपसॅप (CropSap) कार्यक्रमांतर्गत मौजे नानेली येथे आज, मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी नानेली येथील जयवंत घाडी यांच्या घरी भात पिकाची शेतीशाळा वर्ग क्रमांक ४ चे कृषी सेवक ओम राऊत यांच्याकडून आयोजन करण्यात आले. या शेतीशाळा वर्गात शेतकऱ्यांना भात पिकांच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी मा. गायत्री राऊत मॅडम आणि कृषी सेवक ओम राऊत यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिज्ञा आणि प्रार्थनेने झाली.
शेतीशाळेत खालील महत्त्वाच्या विषयांवर माहिती देण्यात आली:
* भात पिक परिसंस्था (RESA) निरीक्षणे व सादरीकरण: भात पिकाच्या संपूर्ण परिसंस्थेचे निरीक्षण कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन.
* भात पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन: पिकांवरील विविध रोग आणि किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना.
* दशपर्णी अर्क माहिती व उपयोग: नैसर्गिक कीटकनाशक म्हणून दशपर्णी अर्काचा वापर कसा करावा, याची माहिती.
* भात शेतातील पाणी व्यवस्थापन: योग्य पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व आणि पद्धती.
* कामगंध सापळा प्रात्यक्षिक: भात पिकातील खोडकीडा चे कामगंध सापळ्याचा उपयोग नियंत्रण करणे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
या व्यतिरिक्त, उपस्थित शेतकऱ्यांसाठी एक खेळ देखील घेण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमात उत्साह टिकून राहिला.
कार्यक्रमाच्या शेवटी, मा. मंडळ कृषी अधिकारी माधुरी राऊत मॅडम यांनी शेतकऱ्यांना थेट बांधावर घेऊन भात पिकावरील कीड आणि रोगांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून मार्गदर्शन केले.सरते शेवटी प्रगतशील शेतकरी ज्योतिका घाडी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
