You are currently viewing देवबागचे सुपुत्र काशिनाथ राऊळ यांची राष्ट्रपती पदकसाठी निवड…

देवबागचे सुपुत्र काशिनाथ राऊळ यांची राष्ट्रपती पदकसाठी निवड…

देवबागचे सुपुत्र काशिनाथ राऊळ यांची राष्ट्रपती पदकसाठी निवड…

कुडाळ

तालुक्यातील देवबाग गावचे सुपुत्र असलेले आणि सध्या नवी मुंबई येथे महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ यांची गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे. त्यांचे हे यश गाबीत समाजासाठी अभिमानास्पद असून, याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या राष्ट्रपतींकडून शौर्य पदक, राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवेचे पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक हे विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिले जातात. या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलातील ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुणवत्तापूर्ण सेवेच्या पदकासाठी निवड झाली आहे. यात श्री.राऊळ यांचा समावेश आहे. या यशाबद्दल अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य तसेच रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे येथे आयोजित एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी राऊळ यांचा सत्कार केला. यावेळी प्रभारी अधिकारी वैभव रोंगे, पोलीस उपनिरीक्षक संजय टिळेकर आणि इतर पोलीस अंमलदार उपस्थित होते. १९८८ साली पोलीस दलात रुजू झालेले काशिनाथ राऊळ यांनी आपल्या ३७ वर्षांच्या सेवाकाळात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५, दौंड, पुणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि महामार्ग पोलीस पथक अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. ३१ ऑक्टोबर, २०२५ ला ते सेवानिवृत्त होणार आहेत. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांना हे प्रतिष्ठित पदक मिळाल्याने त्यांच्या कार्याचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. यापूर्वी त्यांना १ मे, २०१७ ला पोलीस महासंचालक पदक देऊन देखील गौरवण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा