*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावण आला श्रावण आला..*
सुंदर सुंदर मनात मंदिर
मनभावन पावन श्रावण आला..
टाळ नि मृदुंग किणकिण घंटा
नाद हा घेऊन श्रावण आला…
सृष्टीचा लाडका पावन पवित्र
आनंद आनंद गुंफत सुत्र
हिरवाईचे गात मंगल स्तोत्र
बगळ्यांची माला घेऊन आला..
इंद्रधनुष्य, सांडती रंग
रंग खेळतो नभी श्रीरंग
पुष्पवाटीका कमलदले
सजवित सृष्टीला श्रावण आला…
सळसळ सळसळ पाऊस धारा
ऊन्हात चमके मोरपिसारा
घमघम घमघम सुटतो गंध
प्राजक्त शिंपत श्रावण आला…
ऊनपाऊस चालतो खेळ
सण खेळती पोरी लडिवाळ
आमराई झोका,साजण झुले
लाजत मुरकत श्रावण आला…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
