You are currently viewing कबुलायतदार जमीन प्रश्न सुटवण्यात आमदार केसरकर यांचा सिंहाचा वाटा – संजू परब

कबुलायतदार जमीन प्रश्न सुटवण्यात आमदार केसरकर यांचा सिंहाचा वाटा – संजू परब

फटाके गतवर्षीचे, दिखावा यावर्षीचा; खोट्या दिखाव्याने निवडणुका जिंकता येत नाहीत

सावंतवाडी : गेळे गावातील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे सुटला असून गतवर्षीच तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत गेळे गावातील सातबाऱ्याचे वाटप झाले होते. तरीदेखील भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे हे “गेळे गाव महाराष्ट्र शासनाच्या सातबारा नोंदीतून स्वतंत्र झाले” असा दिखावा करून जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख नारायण राणे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, झेवियर फर्नांडिस, परीक्षित मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संजू परब म्हणाले, “आंबोली, गेळे व चौकुळ या तिन्ही गावांचा कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न बराच काळ प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी वारंवार प्रयत्न केले. यासाठी वनमंत्री आणि महसूलमंत्र्यांसोबत बैठकाही घेतल्या. त्याचे फलित म्हणून वर्षभरापूर्वी शासन निर्णय घेऊन आंबोली आणि गेळे गावातील खाजगी जमिनीचे वाटप झाले. त्यानंतर चौकुळ गावाचाही प्रश्न मार्गी लागला. त्यावेळी गेळे ग्रामस्थांनी पेढे वाटप करून आनंदही व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत आता संदीप गावडे यांनी हा प्रश्न सुटल्याचा खोटा आभास निर्माण करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे.”

ते पुढे म्हणाले, “मुळात आंबोली आणि चौकुळ गावातील ग्रामस्थांची मागणी होती की वनजमीन आणि खाजगी जमीन यांचे वाटप एकत्र व्हावे. त्यामुळे तेथील खाजगी जमिनीचे वाटप अद्याप झालेले नाही. अशा वेळी दोन-तीन वर्षांनंतर कोणी येऊन ‘हा प्रश्न मी सोडवला’ असे म्हणणे चुकीचे आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटे दावे करणाऱ्यांनी दिशाभूल करू नये. खोट्या प्रयत्नांतून निवडणुका जिंकता येत नाहीत.”

संजू परब यांनी संदीप गावडे यांच्यावर टीका करताना स्पष्ट केले की, “कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न समितीचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर आहेत. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या आदेशाने त्यांची निवड करण्यात आली. या प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के काम आमदार केसरकर यांनी केले, त्यामुळे त्यांचे नाव घेणे संदीप गावडे यांचे कर्तव्य होते. मात्र त्यांनी ते टाळले. हे चुकीचे आहे.”

ते पुढे म्हणाले, “ज्याप्रमाणे आज संदीप गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गेळे गावाच्या जमिनीबाबत दावा केला, तसेच आम्हीही उद्या चौकुळ व आंबोली गावाच्या जमिनीबाबत पत्रकार परिषद घेऊ शकतो. पण ग्रामस्थांची मागणी आहे की खाजगी आणि वनजमिनीचे वाटप एकत्र व्हावे. त्यामुळे उगाच जुन्या विषयाचे फटाके यावर्षी फोडण्याचा प्रयत्न करू नका.”

प्रतिक्रिया व्यक्त करा