You are currently viewing बंदिवास कृष्णाचा..

बंदिवास कृष्णाचा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम लेख*

 

*बंदिवास कृष्णाचा..*

 

कृष्णा, आज तू मला ‘बंदिवासातील कृष्ण’ म्हणून तू कसा होतास ते व्यक्त करावसं वाटतंय! जन्माला येण्यापूर्वीच देवकी- वसुदेव कंसाच्या बंदी शाळेत असताना तू देवकीच्या पोटात- बंदीवासात होतास, बंदिस्त होतास !त्यावेळी कंस तुला काहीही करू शकला नाही. तुझा जन्मच कंसाच्या पारिपत्यासाठी असल्याने नऊ महिने देवकीच्या कुशीत राहून जन्मल्याबरोबर मथुरेत जाण्याचे तुझ्या नशिबात होते!

तिथे बालपणीच्या क्रीडा करता करता तू तुझ्या गोप – सवंगड्यांच्या प्रेमाच्या बंदीवासात होतास! त्यावेळी कालिंदीच्या डोहातील कालिया मर्दन, पूतना राक्षसीणी चा वध तसेच काही राक्षसांचा संहार (शकट-विकट) या सर्व गोष्टी तुझ्या हातून घडणार होत्या, त्यामुळेच तू त्या गोकुळाच्या प्रेमात होतास! राधेच्या भक्तिमय प्रेमाच्या बंदीवासात तू इथे सापडलास! हा प्रेमाचा बंदिवास तुझ्या आयुष्याला वेढून होता.. तिने दिलेले प्रेमाचे मोरपीस अखंड तुझ्या मस्तकी होते.. गोकुळातून बाहेर पडलास तरी तुझी मुरली ही राधेच्या आधीन झालेली होती. त्या गोकुळाच्या प्रेममय बंदिवासातून बाहेर पडल्यावर तू पुन्हा तिकडे मागे वळून पाहिले नाहीस!

तू सांदिपनी ऋषींच्या आश्रमात अध्ययनासाठी गेलास, तिथे वेगवेगळ्या मित्रांच्या सहवासात राहिलास पण नकळत सुदाम्याच्या प्रेमाचा पाश तुझ्या मनाला गुंतवून ठेवला होतास, त्याला सोडून तू गेलास पण मित्रत्वाच्या बंदिवासात तू नक्कीच अडकलेला होता.द्वारकेला सुदामा तुला भेटायला आला आणि त्याची परिस्थिती जाणून तू त्याला ‘सुदाम नगरी’ दिलीस तो मित्रत्वाचा, बंधुत्वाचा प्रेमपाश तुला मनात नक्कीच अडकवून गेला! पुढे मथुरा सोडून तू द्वारकेला नवीन राज्य स्थापन केलेस. द्वारकेचे तुझे राजेशाही आयुष्य तुला अष्टराण्यांच्या बंदिवासात ठेवत होते. तो तुझा तारुण्याचा सोनेरी बंदीवास होता. सत्यभामा, रुक्मिणी यासारख्या राण्यांनी तुला त्यांच्या प्रेमाच्या बंदीवासात गुंतवून ठेवले! सोळा सहस्र राण्यांची सुटका करून तू त्यांना आपल्याबरोबर विवाहाच्या बंदीवासात अडकवलेस!

असे हे तुझे आयुष्य सतत गुरफटलेले होते! कंसाचे पारिपत्य तुझ्यासाठी आव्हान होतं ,ते तू पार पाडलंस आणि मुक्ततेचा श्वास घेतलास! स्वतःचे राज्य निर्माण केलेस! पांडवांच्या बद्दल तुला प्रेम होते … द्रौपदी स्वयंवराच्या वेळी पांडवांची साथ करून द्रौपदीला राणी पद मिळवून दिलेस.. सुभद्रा तुझी सख्खी बहिण होती तर द्रौपदी ही तुझी मानलेली बहीण होती. जिची साथ देताना तिचा “सखा” म्हणून तू द्रौपदीच्या मनाच्या बंदीवासात कायमच राहिलास!

“महाभारत” युद्धात दृष्टांचे निर्दालन करण्यासाठी तू पांडवांच्या बाजूने उभा राहिलास. कुरुक्षेत्रावर आपल्यासमोर उभ्या असलेल्या सैन्यात द्रोण, भीष्म आणि सर्व रथी, महारथी पाहून व्यथित झालेल्या अर्जुनाला तू मार्ग दाखवलास हे तुझे मोठे ऋण आहे! खरंतर हे सर्व रथी- महारथी यांचे तुझ्यावर खूप प्रेम होते, पण तुझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी वेगवेगळ्या रूपात बंदिस्त होते! कर्तव्य कर्म करत असताना तू कधीही मागे आला नाहीस. देवरूपातून मनुष्य रूपात येऊन तू सतत कर्म करीत राहिलास आणि त्यामुळे आलेले त्रास ही भोगत राहिलास! असं वाटतं की, मानव जन्मात आल्यावर हा देहरूपी पिंजऱ्याचा बंदीवास तू भोगलास आणि कुणालाही न कळता त्या पिंजऱ्यातून, तुझ्या जीव रूपातून तू मुक्तही झालास! तेव्हाच तुझा या पृथ्वीतलावरील बंदीवास संपला असं म्हणावंसं वाटतं!

राम आणि कृष्णांचे जन्म हे आपल्याला जीवनातील योग्य मार्ग दाखवण्यासाठी आलेले होते! अन्यथा त्यांना या मानव रुपाची काय ओढ असणार? पण त्यांच्यातील देवत्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि मानवामध्ये जागृती निर्माण करण्यासाठीच हे मनुष्य रूपात जन्माला आले..

जेव्हा जेव्हा कृष्ण जन्म येतो, तेव्हा विविध विचार मनात पिंगा घालत राहतात… ते शब्द रूप करण्याचा व्यक्त होण्याचा हा प्रयत्न!

यदा यदा ही धर्मस्य, ग्लानिर्भवती भारत!

अभ्युत्थानम धर्मस्य, तदात्मानं सृजाम्यहम!

 

उज्वला सहस्रबुध्दे,पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा