उपोषणाचा इशारा यशस्वी; डेगवे-तांबोळी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 13.65 लाखांचा निधी मंजूर
बांदा
डेगवे, तांबोळी, असनिये, घारपी, भालावल, कोनशी, झोळंबे आणि फुकेरी या गावांमधील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून रस्त्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर डेगवे-तांबोळी रस्त्यावरील वनविभागाच्या अखत्यारीतील 300 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी श्री. प्रवीण बाबाजी देसाई (अध्यक्ष, भाजपा सावंतवाडी तालुका किसान मोर्चा) यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
या उपोषणाची तात्काळ दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी सदर रस्त्यासाठी 13 लाख 65 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, गणेश चतुर्थीपूर्वी रस्ता वाहतुकीस सुयोग्य करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रवीण देसाई यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
याबद्दल त्यांनी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे तसेच उपोषणास पाठिंबा देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचे आणि स्थानिक जनतेचे आभार मानले आहेत.
