पालकमंत्री नितेश राणेंचा थेट संवाद, आंदोलनकर्त्यांत समाधान
सिंधुदुर्गनगरी :
नागरिकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडवण्याचा नवा पायंडा सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांनी घातला आहे. याच परंपरेला पुढे नेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘न्याय दरबार’ भरवला. या दरबारात विविध मागण्यांसाठी उपोषणाची हाक दिलेल्या आंदोलनकर्त्यांना बोलावून त्यांचे प्रश्न सविस्तर पने पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांसमवेत ऐकून घेतले. काहींचे निर्णय त्याच ठिकाणी देण्यात आले तर काहींचे निर्णय अधिकाऱ्यांना सुनावणी लावून कायद्याच्या चौकटीत देण्याच्या सूचना दिल्या.
एकाही व्यक्तीला उपोषणाच्या मार्गावर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन ज्या अधिकाऱ्याने केले नाही. अशा अधिकाऱ्यांना यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपोषणकर्त्या व्यक्तीच्या समोरच फैलावर घेतले त्याच्या कामाची झाडाझडती घेतली. तर काही उपोषणकर्त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्यात आल्या, तर काहींसाठी ठोस कालमर्यादा जाहीर करण्यात आली. परिणामी स्वातंत्र्य दिनी होणारी अनेक आंदोलने स्थगित करण्यात आली.
पालकमंत्र्यांच्या या पुढाकारामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या न्यायासाठी ‘न्याय दरबार’ ही प्रभावी लोकशाही व्यासपीठ ठरल्याचे मत व्यक्त होत आहे.

