You are currently viewing तिलारी अम्युझमेंट पार्क आणि शिरशिंगे धरण प्रकल्पाला गती

तिलारी अम्युझमेंट पार्क आणि शिरशिंगे धरण प्रकल्पाला गती

तिलारी अम्युझमेंट पार्क आणि शिरशिंगे धरण प्रकल्पाला गती;

आमदार दीपक केसरकर यांची जलसंपदा मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

सावंतवाडी

सावंतवाडीचे आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी ‘सेवासदन’ येथे भेट घेतली. या बैठकीदरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेत दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण परिसरात प्रस्तावित अम्युझमेंट पार्क प्रकल्प आणि सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे धरण प्रकल्प यांचा समावेश होता. आमदार केसरकर यांनी तिलारीतील अम्युझमेंट पार्क प्रकल्पाची सद्यस्थिती, त्यातील अडचणी आणि संभाव्य पर्यटन विकासाबाबतची माहिती दिली. या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटनाला नवे आयाम मिळू शकतात, असे त्यांनी सांगितले.

जवाबादारपणाने प्रतिसाद देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पासंदर्भातील अडचणी दूर करून तो लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. यासाठी लवकरच तिलारी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

त्याचप्रमाणे, शिरशिंगे धरण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी येत असलेल्या अडचणींवर सखोल चर्चा झाली. मंत्री महाजन यांनी या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयात लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत सर्व संबंधित विभागांना एकत्र आणून कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर दिला जाणार आहे.

आमदार दीपक केसरकर यांच्या या पुढाकारामुळे मतदारसंघातील हे दोन महत्वाचे प्रकल्प पुढे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिलारीतील अम्युझमेंट पार्कमुळे स्थानिक पर्यटनाला चालना, तर शिरशिंगे धरणामुळे शेती आणि पाणीपुरवठ्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा