*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*गाथा देशभक्तीची*
मुलांनो गेली अनेक वर्ष तुम्ही स्वातंत्र्यच बघताय. तुम्हाला पारतंत्र्य ,गुलामगिरी, छळवाद अत्याचार प्रजेवर झाले ते माहितीच नाहीत.
सोन्य़ाचा धुर येत असणार्या आपल्या देशावर या मसाले शोधणार्या परकियांची नजर पडली आणि एकापाठोपाठ परकिय आपल्य़ा मातृभुमीवर येऊन धडकायला लागले.
इथे फितुरी होतीच पण येणार्यांजवळ आधुनिक शस्त्र होती. त्याला घाबरून लोकं त्यांचे वर्चस्व मान्य करत गेले आधुनिकतेचे ज्ञान नसलेल्या आपल्या मातृभुमीचा त्या परकियांनी हळूहळू या ना त्या मार्गाने ताबा घेतला.
जनतेचे हित तर कधीच नव्हते पण लुटालुट मात्र खुप चालू होती. काही थोर महात्मे यावर विचार करत पुढे आले… काही एकत्र झाले.
काहींनी मवाळ होत शिक्षण, सुधारणा, जुन्या रिती परंपरा रूढी मोडीत काढणे. शिक्षणाचा प्रसार करणे हा रस्ता घेतला.
काहींनी पेपर चालू केले व इंग्रजांवर जहाल टिका करू लागले, चुका दाखवू लागले.
काही बाहेर जाऊन बॉंब तयार करणे, फेकणे इ. शिकुन आले. आक्रमक होऊन गोळ्या झाडणे , बॉंब फोडणे, सरकारी खजिने लुटणे असे क्रांतीकारक झाले.
काही बाहेर जाऊन शिकुन आले व इथे इंग्रजी शिक्षण चालवू लागले.
काहींनी अहिंसेचे शांतीचे शस्त्र घेतले तर काही सत्याग्रह बहिष्कार टाकू लागले. प्रभात फेरी काढुन लोकात जागृती निर्माण केली.
कोणी पकडले गेले.. अनन्वित हाल अपेष्टा सोसल्या. अंधार कोठडीत डासांनी फोडुन काढलं पण कोणीही एक क्षणभरही डगमगले नाही. ‘पूर्ण स्वातंत्र्य’या ध्यासांनी भारले गेले होते. कधीच त्या धेयापासुन विचलित झाले नाहीत.
घरावर नांगर फिरवला गेला, जवळची माणसे हाल अपेष्टात देशोधडीला लागली. संसार सुखास पारखे होऊन तुरूंगात डांबले गेले.
पण मागे हटले नाहीत. स्त्रीयापण मागे नव्हत्या स्वातंत्र्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. सर्वांच्याच नसानसातुन देशभक्तीचे एकच लाल रक्त वहात होते. बाहुत देशाभिमान दौडत होता. मनामनात फक्त स्वातंत्र्य खेळत होते.
वेडातच दौडले ते महात्मे.
झुंझले ब्रिटिशांशी आणि केले त्यांना बेजार.
मगच शेकडो वर्षाच्या अथक संघर्षानंतर इंग्रज शेवटी हैराण झाले व निघुन गेले. आपली भारतमाता स्वतंत्र झाली.
आपले संविधान, कायदे, हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले.
प्रजासत्ताक हे प्रजेच्या हिताचे आले.
याचे महत्व हा संघर्ष समजाऊन घेतो तेव्हाच कळते.
शिवरायांनी दिलेला संदेश “शत्रुच्या छाताडावरच बसुन पाणी पाजा,”भारतीयांनी तंतोतंत पाळला.
सारी झाडे चंदनाचीच. चंदनासारखी देशासाठी झिजली. बलिदान देत देशासाठी फासावर लटकली. हाल अपेष्टा काळकोठड्या, चाबकाचे वळ , कोलू चालवणे सारे सारे सोसले पण ‘राष्ट्हित सर्वतोपरी’ हा बाणा राखला.
स्मरा ही स्वातंत्र्याची गाथा.
देशभक्तीची देशप्रेमाची कथा.
अनुराधा जोशी.अंधेरी ६९
9820023605

