You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी पुनश्च श्री मंगेश मसके

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी पुनश्च श्री मंगेश मसके

*जिल्हा प्रतिनिधी रुजारियो पिंटो, कार्यवाह श्री.संतोष सावंत तर कोषाध्यक्ष श्री अनंत वैद्य..!*

 

*युवाशक्तीला बळ देऊन कोमसापची युवा चळवळ वृद्धिंगत करणार: मंगेश मसके*

 

कुडाळ: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडली. यावेळी कोमसापच्या सन २०२५- २८ या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवडीची कोमसापची परंपरा राखत जिल्हाध्यक्षपदी श्री.मंगेश मसके यांची पुनश्च निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुजारिओ पिंटो, कोषाध्यक्ष अनंत वैद्य तर कार्यवाह संतोष विठ्ठल सावंत यांची नियुक्ती जिल्हाध्यक्षांनी जाहीर केली. निवड प्रक्रियेचे निरीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अनंत वैद्य यांनी काम पाहिले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या घटनेप्रमाणे जिल्ह्यातील विविध तालुका शाखांचे तालुकाध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधी जिल्हाध्यक्षांची निवड करतात. अनुक्रमे कुडाळचे संतोष वालावलकर व मंगेश मसके, कणकवली माधव कदम व संदीप वालावलकर, सावंतवाडी दीपक पटेकर व संतोष सावंत, मालवणचे सुरेश ठाकूर व रुजारिओ पिंटो या आठ जणांनी नवीन अध्यक्षांची निवड केली. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष माधव कदम यांनी श्री. मंगेश मसके यांनी आपल्या मागील कार्यकाळात कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गच्या जडणघडणीत उल्लेखनीय कार्य केल्याने पुढील तीन वर्षांसाठी पुनश्च त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला याला कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा.संतोष वालावलकर यांनी अनुमोदन दिले आणि जिल्ह्यातील चारही शाखांच्या आठ प्रतिनिधींनी सदरच्या प्रस्तावाला मंजुरी देत श्री.मंगेश मसके यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध फेरनियुक्ती करण्यात आली. निवडणूक निरीक्षक अनंत वैद्य यांनी मंगेश मसके यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

जिल्हाध्यक्षपदी निवड होताच मंगेश मसके यांनी जिल्ह्याची तीन वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर केली. यात अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा प्रतिनिधी रुजारिओ पिंटो, कोषाध्यक्ष अनंत वैद्य, कार्यवाह संतोष सावंत, सह कार्यवाह सुरेश पवार, सदस्य – प्रा. संतोष वालावलकर, सुरेश ठाकूर, माधव कदम, संदीप वालावलकर, दीपक पटेकर आणि चिराग बांदेकर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी विविध समित्यांच्या प्रमुखांची देखील नावे जाहीर केली. यामध्ये महिला साहित्य संमेलन समिती प्रमुख सौ. वृंदा कांबळी, जिल्हा संमेलन विठ्ठल कदम, जनसंपर्क समिती प्रमुख भरत गावडे, विधी व कायदा समिती प्रमुख ॲड.अमोल सामंत, लेखा परीक्षण समिती प्रमुख सीए केशव फाटक, सामाजिक कार्य समिती प्रमुख रणजित देसाई, प्रिंट मीडिया समिती प्रमुख गणेश जेठे, सोशल मीडिया समिती प्रमुख निलेश जोशी, ग्रंथनिवड / पुरस्कार समिती प्रमुख अभिमन्यू लोंढे यांचा समावेश आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य चळवळीत युवकांचा सहभाग फारच कमी असल्याने लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमधून युवा साहित्यिकांची निवड करून नवीन युवा समिती गठित करून जिल्ह्यात कोमसापची युवा चळवळ वृद्धिंगत करून भविष्यात नव साहित्यिक तयार करण्याकडे आपला भर राहील व आपले आदरस्थान कोमसापचे संस्थापक अध्यक्ष मधुभाईंना अभिप्रेत असलेलं साहित्य कार्य सुरू ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले लवकरच जिल्ह्यातील केवळ कोकण मराठी साहित्य परिषदेचेच नव्हे तर सर्वच साहित्यिकांचा साहित्य मेळावा मधुभाईंच्या तसेच सांस्कृतिक मंत्री आणि पालकमंत्री यांच्या उपस्थित घेऊन जिल्ह्यातील पुस्तके प्रकाशित झालेल्या साहित्यिकांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

भरत गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले व सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले. यावेळी कार्यकारिणी मंडळाच्या सभेसाठी मंगेश मसके, अनंत वैद्य, उषा परब, माधव कदम, रणजित देसाई, गणेश जेठे, संदीप वालावलकर, सौ. वृंदा कांबळी, दीपक पटेकर, संतोष सावंत, सुरेश पवार, संतोष वालावलकर, रुजारिओ पिंटो, सुरेश ठाकूर, ॲड. नकुल पार्सेकर, विठ्ठल कदम, भरत गावडे  सी.ए. केशव फाटक, अभिमन्यू लोंढे, निलेश जोशी, प्रा. रुपेश पाटील, प्रा सुभाष गोवेकर, डॉ. सौ. दीपाली काजरेकर, स्वाती सावंत आदि कोमसाप सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा