*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रक्षाबंधन*🌹
रक्षाबंधनाचा सण
वाट भावाची पाहते
सजली दारी रांगोळी
चित्र माहेराचे रेखाटते
सण रक्षाबंधनाचा
दिवा लावते दारात
माझ्या भावाची आठव
साठवते हृदयात
भावा बहीणीची कशी
जगावेगळी ती माया
असतो सदा पाठीशी
माझा गुणी भाऊराया
भावासाठी बहिणीचं
हृदय भरलं असतं
माहेरच्या फांदीवर
नुसतं डोलतं बसतं
येईल कधी भाऊ
बसेल कधी पाटी
लक्ष्य दिव्यांच्या ज्योती
आज उजळल्या ताटी
भाऊ माझा बहुगुणी
त्याच्यावर लई माया
आई बाबांचीही असे
त्याजवर छत्रछाया
गरीबा घरी बहीण
नांदते तुझी भावा
पाठीशी नित्य राहु दे
फक्त मायेचा ओलावा
नको धन दौलत
राहो परिवार सुखी
तुझ्या अंगणात राहो
तुळशी हरिपाठ मुखी
संकटी येई धावुन
सदा माझा पाठीराखा
जणु द्रौपदीच्या पाठी
श्रीकृष्ण भाऊसखा
शेतकरी माझा भाऊ
त्याकडे काय मागवा
दीड खणाची गं चोळी
एका रातीचा विसावा
गुणी माझा भाऊ
जीवापाड माझी माया
दीर्घायुष्य लागु दे
प्रार्थना हिचं देवराया
*शीला पाटील. चांदवड.*

