*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*राखी बांधा ग बांधा ग….*
राखी बांधा ग बांधा ग लाखमोलाचा हा भाऊ
किती लाडाने म्हणतो, म्हणतो मला “ ताऊ”
अंगाखांद्यावर माझ्या वाढविले मी लाडाने
माझ्या पाठोपाठ आला पाठविले हो देवाने..
पाठराखण करतो जणू शेपूट ते माझे
मला बोलता हो कोणी तोंड त्याचे मग वाजे
नाही बोलू देत कोणा म्हणतो माझी ताई
आई नसल्यावरती होते मग त्याची आई…
लळा फारच हो त्याला नजरेत प्रेम दाटे
त्याला हृदयी ठेवावे असे मला रोज वाटे
जीव ओवाळून टाका असे असते हो नाते
भाऊ पाहताच येते पहा प्रेमाचे भरते…
धागा राखीचा नाजुक जणू करतो राखण
ओवाळता भाऊराया आयु वाढवे औक्षण
येती जवळ माणसे नात्यांची होई उजळणी
मग ज्याच्या त्याच्या घरी आहेच आणिबाणी..
दोन दिवस भेटावे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
मग मनात मनात एकमेका आठवावे
मुखे उजळती पहा वाढे सणातली गोडी
मग चालतेच आहे संसाराची पहा गाडी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

