कलसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींकडून नेत्रदिव्यांना राखी बांधून अनोखा स्नेहबंध
NAB संस्थेच्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद
सावंतवाडी
सावंतवाडीतील कलसुलकर हायस्कूलच्या सातवीतील विद्यार्थिनींनी आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून नेत्रदिव्य (दृष्टीबाधित) लाभार्थ्यांना राख्या बांधत एक भावनिक व सामाजिक स्नेहबंध निर्माण केला. हा उपक्रम NAB (National Association for the Blind) संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला NAB चे अध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर यांनी विद्यार्थ्यांना NAB संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संस्थेच्या नेत्र रुग्णालयात डोळ्यांची तपासणी पूर्णपणे मोफत असून, शस्त्रक्रिया अत्यंत वाजवी दरात केली जाते. या सर्व शस्त्रक्रिया अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतात.
श्री. उचगावकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सल्ला देताना, मोबाईलचा वापर कमी करून मैदानी खेळ, योगसाधना आणि अभ्यासावर भर द्यावा, असे सांगितले. या उपक्रमामुळे समाजात आरोग्याबद्दल जागरूकता वाढावी आणि गरजू रुग्णांपर्यंत मोफत सेवा पोहोचावी, हा संस्थेचा उद्देश आहे.
या प्रसंगी NAB चे सचिव श्री. सोमनाथ जिनी, कोशाध्यक्ष सौ. विनय बाड, रो. सुहास साटोसकर, श्री. पी. व्ही. बागुल सर, वैष्णवी सावंत मॅडम तसेच नेत्रदिव्य लाभार्थी श्री. बाबुराव गावडे, श्री. समीर नाईक व श्री. शिर्के सर उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी उपस्थित नेत्रदिव्यांना आणि NAB पदाधिकाऱ्यांना औक्षण करून राखी बांधली. त्यानंतर सर्व लाभार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
हा उपक्रम विद्यार्थिनींच्या संवेदनशीलतेचे आणि NAB संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.
