*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*मागच्या पिढीतल्या आया(आई)..*
फारच ग्रेट होत्या त्या स्त्रिया, खरंच, खूप दूरदृष्टीच्याही होत्या. कोंड्याचा मांडा कसा
करावा हे शिकावं त्यांच्याकडूनच! काही ही
वाया घालवायचे नाही हा नियमच. खेड्यात
ज्यांच्याकडे थोडीफार शेती आहे त्यांच्या डाळी
साळी घरच्याच असंत. तूर मूग हरबरा चवळी
उडीद मठ तीळ हे सारे कडेकडेने पेरलेले असे.
मग घरच्या पुरते वर्षभर पुरेल एवढे कडधान्य
नक्की मिळत असे. शिवाय लसूण कांदाही घरचाच.
मग ही पिके आली की ती भिजवणे तेल लावून
वाळवणे, घरच्याघरी भरडकीवर त्यांच्या डाळी
करून कांडून कुटून पाखडून उन दाखवून त्या
भरून ठेवणे हा बायकांचा मोठा उद्योग असे. घरीच सगळी कामे घरीच असल्यामुळे दिवसभराच्या वेळापत्रकात या कामांना वेळ नसे.
मी ही कामे रात्री पहाटे उठून करावी लागत. शिवाय रोजचे गहू बाजरी दळणे तर असायचेच.ही ढोर मेहनत बायका करत पण
घरातल्यांना कुणाला त्याचे सोयर-सुतक नसे,
इतके ते गृहित धरलेले होते की, बायका किती
दमत असतील हे ही कुणाच्या गावी नसे. आज
सातकिलो दळण घेऊन एक मांडी मुडपून मुठमुठ दाणे जात्यात टाकून जातं ओढून पहा
मग कळेल रोज एक एक तास बायका जातं
ओढून किती घामाघूम होत असतील. मी पाहिलं
आहे ना? पण तेव्हा कुठे अक्कल होती? आता
जात्यावर बसलेली आई व काकू दिसतात. एकमेकींना दळू लागत, भार हलका करत असत.
रात्री खाटा अंथरूणं टाकून झाल्या की, आई डाळी भरडायला घेत असे. आमच्या उशाशी बसून
घुरू घुरू तिची भरडकी चालू होई नि त्या संगीतात आमचा डोळा कधी लागायचा हे ही आम्हाला कळत नसे. तिचा हात मात्र चालू असे, माहित नाही किती वेळ ते!मग पाटीत ते भरून
ठेवायचे व वेळ मिळेल तसे पाखडायचे, गाळायचे. हो, त्यात चूर निघत असे ती गाळायची.
पाखडायची, ती वेगळी भरून ठेवायची.
तीच चूर संध्याकाळी तासभर भिजवून ठेऊन त्यात लसूण मिरची घालून पाट्यावर ती वाटायची व त्याचे कांदा घालून तव्यावर कोंडाळे
लावायचे. हे कोंडाळे झणझणीत असे इतके चवदार असे की मला ते आताही चुलीवर शिजतांना दिसते आहे. जोडीला तोंडी लावायला
घरच्या चिंचा गुळात भिजत घालून केलेले आंबट
गोड पन्हे. वारे वा काय पण बेत असे तो. असे ५६
फाईव्हस्टार झक मारतील त्या पुढे! फक्त कोंडाळे नि एकएक सीप पन्हे पित ते खाण्यात
काय मजा होती हे तुम्हाला नाही कळायचे राव!
त्या चुऱ्या पाट्यावर वाटायचे काम माझ्याकडे
असे. आई मला कोंडाळे ही लावायला लावत असे.
अजून अगदी बारीक रव्यासारखी चुरी व पाखडून
निघालेली फोलपटे तगारीत भाकरीचे शिळे तुकडे टाकून कालवायचे, थोडा पाण्याचा सपका मारून संध्याकाळी गाईगुरं दारापुढे आली की त्यांच्या पुढे ती पाटी ठेवायची. कृतज्ञतेने पहात ती जनावर मोठ्या मजेत तो
खाऊ खात असत अगदी चाटून पुसून की त्याच
पाटीत बादली भरून पाणी ओतले की ते पोटभर
पिऊन बिचारे तृप्त होत मालकिणीकडे पहात पहात सालदाराबरोबर वाडघ्याचा रस्ता धरत असत.
कष्ट कष्ट नि कष्ट.. पण त्यांची जाणीव कुणीही दाखवत नसे. एवढे करून दोन्ही वेळच्या
भाकरी बडवणे, चूलपोतारा, सडासारवण सारे घरीच बायका करत असत. पण कुणी नवरा तू
दमलीस म्हणणारा मी तरी पाहिला नाही इतके
हे काम गृहित होते. मजुरी करणारे नवराबायको
तर शेतातून आल्यावर चुल पेटवत.
घरच्या डाळी व्यवस्थित वाळवून डबे घट्ट झाकणे लावून किंवा पत्र्याच्या कोठ्या भरून
ठेवलेल्या असत. आधी चुऱ्या वापरून संपवायच्या. डाळींना हात लावायचा नाही. त्या
सांभाळून सांभाळून वापरायच्या. का? मी विचारायची आईला. आई म्हणे,” पुढला सालले
पानी नई पडना ते?” “कोठून लयो मंग डाळीसाळी”. पुढच्या वर्षी पिकेलंच हे माहित नाही. मग कुठून आणायच्या डाळीसाळी? असे व्यवहारी गणित असे. त्यामुळे माझ्या आईने
या वर्षाच्या डाळी या वर्षी कधीच खाल्या नाहीत.
वडे पापड शेवयांचेही तेच. कायम गाडगी मडकी
भरलेली असत.इतक्या या महिला व्यवहारी होत्या.माझ्या बहिणीच्या लग्नात एवढ्या मोठ्या गावजेवणात साऱ्या डाळी गहू मटकी पुरून उरल्या.विकत आणल्याच नाही.तेव्हा मी १०
वर्षांची होते.
शेतात गहू जोरात दिसे. बांधाला बांध असलेला एखादा घरी येऊन आईला म्हणे,” आक्का, गहू जोरम्हा
से यंदा बरं”! यावर आईचे उत्तर,” हां भाऊ, घरम्हां इ तवय म्हनसू खरं”. बघा, काय अनुभवाचे शहाणपण आहे हो! हो, शेतात पिक
जोरात आहे हो? पण निसर्गाचा काय भरवसा?
तो कधी होत्याचे नव्हते करेल सांगता येत नाही.
वादळ वारा पाऊस गारा.. काही भरवसा नाही हो? म्हणून ज्या दिवशी पिक घरात येईल ते
आपलं.
एखाद्या दिवशी तोच बांधवाला म्हणे,” गहूवर रोग
पडी ग्या बरं आक्का”!आई म्हणे,” हा भाऊ, जे सर्वासनं हुई तेज आपलं बी हुई”. बघा, कसं उत्तर आहे. अहो, आपण सारे बांधाला बांध आहोत ना? मग सगळ्यांचं जे होईल तेच आपलं होईल.
झाला फायदा तर सगळ्यांचा, नाहीतर सगळेच
खड्ड्यात जाऊ असे हुशारीचे उत्तर आई त्या नाठाळाला देत असे. मग मात्र तो घरातून काढता
पाय घेई.
एखादी नवरी परणून सासरी निघाली की आई
म्हणे,” दखं बैन, “ आते उख्खयम्हां डोकं घालं,
( आता उखळात डोके घातले आहे, लग्न झाले
आहे) आते ते फुटो का ऱ्हावो”? काय शिकवण
आहे हो! लग्न झाले, आता माघारी नाही. जे जे
येईल ते सोसायचे व संसार करायचा. रडगाणे
नको. मी तर हे पक्के लक्षात ठेवले आहे, आजही
त्याच मार्गावरून चालते आहे. संकटे कुणाला
चुकली सांगा ना? मग मला कशी चुकतील?
आता बालपणीच्या गोष्टी आठवल्या की वाटतं,
शोळेची पायरीही न चढलेल्या या स्त्रिया अडाणी
होत्या? छे! छे! व्यवहार व जीवनाच्या पुस्तकात त्या इतक्या तरबेज होत्या की आपणच शिकावे
त्यांच्याकडून! कात्री नसतांना विळीने कपडा कापून चोळी शिवणे, चूल मांडणे यात आई तरबेज होती. तिला गल्लीतही चूल मांडायला
जावे लागे.ही चूल वर्षानुवर्षे टिकत असे.ती सुग्रणही होतीच. काय
आणि किती आठवावे. चापूनचोपून नऊवारीतील
कपाळाला कुंकवाची आडवी चिरी लावलेली
आई डोळ्यासमोर उभी राहते नि तेव्हा टाळक्यात
न शिरलेले तिचे शहाणपण पदोपदी अनुभवाला
येऊन मी नतमस्तक होते.
धन्यवाद..
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

