*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
🌼🌼 प्राजक्तगंध🌼🌼
फुलुनी बरसला अंगणी
पारिजात हसला दारी
सुगंधाची उघडून कवाडे
दरवळला गंध परिसरी.
फुले इवलीशी, गोड हसत
नाजूक केशरी देठी पेलती,
श्वेतपाकळ्यांचा कोमल भार
हिरव्यापर्णसांभारी झुलती .
मंद अनिलासंगे परिमळे
गंध तो पसरे उषःकाली,
प्राजक्ताच्या वृक्षाखाली
शुभ्रनारिंगी गालिचामखमली.
त्या फुला ना ठावे अस्तित्व
पायदळी, की देवाचरणी,
होईल कुठेआत्मसमर्पण
परि हर्षोन्मादे सत्कारणी.
आयुष्य तुझे किती असू दे
परोपकारी परिमळ द्यावा ,
जन्म तुझा समर्पणासाठी
हा संदेश तुज साठी मानवा.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

