रेल्वे रूळ चोरीप्रकरणी ठाकरे गट आक्रमक
कणकवली रेल्वे पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा
कणकवली
कोकण रेल्वे मार्गावरील पिंगळी येथे रेल्वेचे रूळ चोरी होऊन त्याचा वापर तेथील स्मशानभूमीच्या बांधकामासाठी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारात कोकण रेल्वेचे काही कर्मचारी व स्थानिक ठेकेदार यांचा सहभाग असून, या चोरीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांकडून होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने आज कणकवली येथील रेल्वे पोलिस ठाण्यावर धडक दिली. आंदोलनादरम्यान ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारत निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला.
वैभव नाईक यांनी सांगितले की, या चोरीबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल करूनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट स्मशानभूमीत वापरलेले चोरलेले रूळ नंतर काढून टाकण्यात आले आणि इतर खांब वापरून काम सुरू ठेवले गेले.
या आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते, रेल्वे अभियंते आणि रेल्वे पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

