*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मनातलं संकेतस्थळ*
एक असतं… मनातलं संकेतस्थळ,
नजरेच्या ओळींमधून
उगाच उघडणारं।
तेथे ना वीज, ना यंत्र, ना संगणक,
फक्त स्मरणांच्या
पावलांनी खुलणारं।।
त्या स्थळावर
नाही साचलेली गर्दी,
तिथे कुणीच नसतं –
पण तरीही असतो “तो”।
कधी एक हसू,
एखादं थांबलेलं क्षणभर,
कधी शब्द न आलेला,
पण पोहोचलेला ध्वनी स्वर।।
त्या घरट्यात ठेवलेले
असतात जुने दिवस,
फडफडतात उषःकालचे क्षण,
पानांवर लिहिल्यासारखे।
कुणाची तरी सोडून गेलेली नजर,
एकटेपणाचा श्वास,
नि ओळखींपलीकडचं
मूक समजून घेतलेपण खास।
कोणालाही न सांगता
आपण जात राहतो तिथे,
जणू मनाने उभारलेलं
एखादं अंतरंगाचं द्वार।
तेच असतं आपलं
खरे संकेतस्थळ,
जिथे कोणीही “लॉगिन” करत नाही,
पण आपल्याला मात्र पुन्हा पुन्हा
परतावसं वाटतं…
डॉ सौ.मानसी पाटील

