*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा अनिल कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावणी सण*
ऊन पावसाची सर आली
श्रावणाची चाहूल लागली
सण पहिला नागपंचमी
नागदेवतेला पूजू चला
बळीराजाचा मित्र हा खरा
लाह्या फुटाणे नैवेद्य त्याला.. .. १
आनंदाच्या फांदीवर झुलू
सख्या संगे मन लागे डोलू
झिम्मा फुगडी अंगणी खेळू
खिदळत आठवणी बोलू… . .. २
जरा जिवंतिका पूजनाला
औक्षणाचे ताट लेकराला
आशीर्वाद सौख्य समृद्धीचा
देई सवाष्ण माझ्या बाळाला… . ३
राखी पौर्णिमेचा सण येई
आनंदाचा उत्साहाचा खास
दृढ होई नाते बंधू संगे
व्रतवैकल्याचा हाच मास… .. .. ४
जन्माष्टमी जागरण रात्री
दहीहंडी काला मजा न्यारी
कृष्ण पाळणे सुरात गाती
रूपे कान्हाची अंतरी सारी… .. .५
बैलपोळा बैल येती घरा
गुळ बाजरी द्यावी दक्षिणा
शिव महिमा स्तोत्रे म्हणूया
दर्शनाला घालू प्रदक्षिणा. … … .६
हरित वैभवाचा महिना
नवचैतन्य नवसंस्कार
शुद्धी आत्म्याची, तनामनाची
जपू परंपरा कुळाचार… . … … ७
सौ. अनघा अनिल कुळकर्णी
पुणे. 🙏९३२३४९१११३.
