You are currently viewing एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त प्रशासनातील दीपस्तंभ 

एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त प्रशासनातील दीपस्तंभ

सेकंदामध्ये काम करणारे आदर्श व्यक्तिमत्व अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे

 

एक जुलै 2025. वेळ सकाळची. माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मी स्क्रीनवर पाहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव व आता महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव म्हणून बदली झालेले श्री विकास खारगे यांचा तो फोन होता. माझ्या बहात्तरव्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी तो केला होता. आपणच तर किती व्यस्त असतो तर मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव किती व्यस्त असतील. शिवाय त्यावेळेस विधानसभेचे अधिवेशन सुरू होते.पण त्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला होता. चांगल्या माणसांचे हेच वैशिष्ट्य असते ते कोणतेही काम वेगळेपणाने करतात आणि ताबडतोब करतात .त्यामुळे त्यांच्याकडे पेंडींग अशी कामेच राहत नाहीत. सुप्रसिद्ध लेखक व वक्ते श्री शिव खेडा यांच्या भाषेत सांगायचं तर

 

जितनेवाले कोई अलग काम नही करते

वे हर काम अलग ढंगसे करते है

 

हे वाक्य श्री विकास खारगे यांना तंतोतंत लागू होते.

 

श्री विकास खारगे यांचा माझा परिचय पंचवीस वर्षापासूनचा आहे. सध्याचे आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार यांच्याशी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट झाली आणि आम्ही अमरावतीला मिशन आयएएस सुरू करायचे ठरविले.

2000 हे ते वर्ष. उद्घाटनाला कोणाला बोलवायचे तर त्यावेळेस यवतमाळला जिल्हाधिकारी असलेले श्री विकास खारगे यांचे नाव पुढे आले. यवतमाळ जिल्हाधिकारी असताना ते चांगल्या कामामुळे चर्चेत होते. शिवाय ते जेव्हा आय ए एस झाले तेव्हा त्यांच्याविषयीच्या बातम्या माझ्या लक्षात होत्या. मी यवतमाळला गेलो. साहेबांनी अतिशय चांगले स्वागत केले आणि उद्घाटनाला येण्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे 12 मे 2000 रोजी ते अमरावतीच्या दंत महाविद्यालयात आले. अमरावतीच्या इतिहासातील ही पहिली स्पर्धा परीक्षा कार्यशाळा. कार्यशाळा संपल्यानंतर माझ्या जिजाऊ नगरातील घरी खारगे साहेबांनी जमिनीवर बसून जेवण केले. माझ्या घरी देखील ते घरच्यासारखे वागले. साहेबांसारखे नाही.

साहेब आता मुख्य सचिव होण्याच्या मार्गावर आहेत. पण साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांना या पदापर्यंत घेऊन आलेली आहे. एवढ्या मोठ्या पदावर असलेला हा सनदी अधिकारी खादीचे कपडे घालतो. मिनिटामध्ये नाही सेकंदामध्ये काम करतोय. मी केव्हाही चांगल्या कामासाठी जर फोन केला तर साहेबांचे काही सेकंदामध्येच उत्तर येते. अगदी मध्यरात्र असली तरी. कधी कधी तर फक्त चार सेकंदामध्ये उत्तर येते .खारगेसाहेब कोणतेही काम ताबडतोब करतात .त्यामुळे ते व्यस्त राहतच नाहीत. व्यस्त लोक ते असतात की जे काम पेंडिंग ठेवतात.

 

परवा अमरावतीच्या श्री संत गाडगेबाबा संस्थांनचे श्री प्रकाश महाराज महात्मे माझ्याकडे आले. श्री संत गाडगेबाबा समाधी मंदिर संस्थांनचे काहीतरी काम श्री विकास खारगेसाहेबांकडे होते. ते म्हणाले मला साहेबांना भेटायचे आहे. वेळ मिळेल काय ? मी साहेबांना एसएमएस केला. फक्त 19 सेकंदामध्ये साहेबांनी दुसऱ्या दिवशी चार वाजताची वेळ दिली. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी श्री विकास खारगे यांच्या शुभांगी जाधव नावाच्या सहाय्यक असलेल्या मॅडमचा फोन आला .

श्री प्रकाश महात्मे किती वाजता येणार आहेत.

त्यांना येण्यासाठी पास बनवायची आहे. ते गाडीने येणार असतील तर गाडीचा नंबर जर सांगितला तर गेटवर तसे सांगता येईल. असा त्या फोनचा आशय होता. याला म्हणतात तत्परता. साहेबांनी स्वतःबरोबरच स्वतःच्या कार्यालयालाही सतर्क व संवेदनशील केले आहे. शुभांगी जाधवांच्या बोलण्यामध्ये आत्मियता होती .जिव्हाळा होता.असाच अनुभव मला मागच्या वेळेस आला होता. मी मंत्रालयात साहेबांना भेटायला जाणार होतो. मंत्रालयात जाण्यासाठी पास लागते. ज्या दिवशी वेळ ठरली होती त्या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयातून श्री विकास खारगे यांच्या कार्यालयातून त्यांच्या सहाय्यक श्रीमती दर्शना खिल्लारे यांचा फोन आला. मला मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत येण्यास अडचण जाऊ नये त्यासाठी तो फोन होता. पण माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ माझ्याबरोबर असल्यामुळे मला पासची गरज भासणार नाही असे मी त्यांना सांगितले. आपल्याला भेटणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीची गैरसोय होऊ नये म्हणून त्याची काळजी घेणारा हा सनदी अधिकारी खरोखरच आगळावेगळा आहे.

 

मागे उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली. अनेक संसाराची वाताहत झाली. महाराष्ट्र मधील काही पर्यटक तिथे अडकून पडले होते. महाराष्ट्र शासनाला एक सक्षम सनदी अधिकारी तिथे पाठवायचा होता. अर्थातच या कामी नाव पुढे आले ते श्री विकास खारगे यांचेच. खारगेसाहेब उत्तराखंडला गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रामध्ये पोहोचविण्याचे कार्य केले. ते त्यांनी अगदी तन-मन-धनाने केले .आत्मियतेने केले. जिव्हाळ्याने केले. त्यांच्या त्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली व त्यांनी केलेल्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाने सत्कार देखील केला.

गतवर्षी मी साहेबांच्या गावाला जाऊन आलो. इचलकरंजी हे साहेबांचे गाव .ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. माझे दुसरे सनदी अधिकारी मित्र व पासपोर्ट मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध लेखक व पुढचे पाऊल या संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात माझे डझनभर कार्यक्रम आयोजित केले होते. त्यातील काही कार्यक्रम श्री विकास खारगे ज्या शाळेमध्ये शिकले ज्या गावामध्ये शिकले त्या गावात होते. खारगेसाहेबांच्या शाळेतील सर्व शिक्षक खारगे साहेबांविषयी आदराने बोलत होते. कार्यक्रम संपला. मी विकास खारगे साहेबांकडे गेलो. साधेसुधे घर. घराचा दरवाजा उघडताच समोर दिसला तो हातमाग. तो सुस्थितीत होता आणि चालू अवस्थेत होता. साहेबांच्या वडिलांचे वय 80 च्या वर आहे. पण त्यांना वाचनाचा फारच छंद आहे. मला ते भेटायला आले तेव्हा त्यांच्या हातात पुस्तकच होते. या वयातही त्यांची प्रकृती ठणठणीत होती. हा वाचनाचा छंद वडिलांकडून विकास सरांनी घेतला असावा .त्यामुळे आयएएस सारखी भारतातील पहिल्या क्रमांकाची परीक्षा ते वरच्या क्रमांकाने पास करू शकले. साहेबांचे घर साधेच होते .पण त्यांचे वडील त्यांचे बंधू अतिशय प्रेमाने वागत होते. आपल्या कुटुंबातील एक सदस्य मुख्यमंत्र्यांचा अपर मुख्य सचिव आहे याचा अहंकार त्या घराला नव्हता.

. घरपण होते. त्यांचे बंधू मला कारपर्यंत सोडायला आले. कारमध्ये बसल्यानंतर मी साहेबांना फोन केला. साहेब म्हणाले माझ्या बंधूंनी तुमचे फोटो काढले आहेत आणि मला पाठविलेही आहेत. साहेबांची तत्परता आणि आत्मियता त्यांच्या कुटुंबातही दिसून आली.

 

मागे कोरोनाच्या काळात माझे मित्र प्रा.प्रवीण विधळे यांनी त्यांच्या संशोधक वृत्तीने कोरोनावर साबणाच्या फेसामुळे नियंत्रण मिळवता येते असा शोध लावला. कोरोनाच्या काळात या संशोधनाची दखल कोण घेणार. जो तो आप आपल्या घरात होता. मी खारगेसाहेबांना फोन लावला. खारगेसाहेबांना ते पटले. त्यांनी लगेच त्या कामासाठी एक अधिकारी नेमला आणि त्या अधिकाऱ्यांना श्री प्रवीण विधळेसरांशी बोलून ते

संशोधन समजून घेण्याची जबाबदारी दिली. आणि त्या संशोधनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अमरावती महानगरपालिकेने ठिकठिकाणी केलेही.

 

साहेबांचा अमरावती दौरा ठरला की मला फोन आलाच म्हणून समजा. यवतमाळ वरून साहेब वेगवेगळ्या ठिकाणी गेले .काही वेळा त्यांच्या फोन क्रमांक बदलले. साहेबांनी आठवण ठेवून मला बदललेले नंबर कळविले आणि जेव्हा जेव्हा अमरावतीला आले तेव्हा मला अमरावतीच्या विश्राम भवनांमध्ये भेटीसाठी बोलाविले. स्नेहभोजनासाठी बोलाविले आणि उपस्थित अधिकाऱ्यांचा परिचयपण करून दिला.

 

आज महसूल दिवस संपूर्ण भारतामध्ये साजरा होत आहे. श्री विकास खारगे यांच्यासारखे प्रशासनामध्ये सनदी अधिकारी असले तर काय बदल होऊ शकतो याची मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खारगे साहेबांचेच द्यावे लागेल. ते ज्या परिस्थितीतून आले त्या परिस्थितीची त्यांना जाणीव आहे आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर असूनही त्यांनी गावाकडची माती आणि गावाकडची नाती जोपासली आहेत. अशा या तन-मन-धनाने समाजकार्य करणाऱ्या सामान्य माणसाला न्याय देणाऱ्या व त्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या महाराष्ट्राच्या अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांना महसूल दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

 

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा