You are currently viewing वागदे गावठणवाडीतील दुर्वांक गावडे याचा अनोखा विक्रम….

वागदे गावठणवाडीतील दुर्वांक गावडे याचा अनोखा विक्रम….

दोन मिनिटांत घेतली 200 हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे; इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

कणकवली

अवघ्या 2 मिनिटे 37 सेकंदांत 200 हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे न थांबता सांगण्याचा अनोखा विक्रम करत कणकवली तालुक्यातील वागदे गावठणवाडी येथिल ८ वर्षांच्या दुर्वांक गुरुदत्त गावडे याच्या या विक्रमाची नोंद इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.  दुर्वांक गावडे याच्या या विक्रमाची नोंद घेत कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी दुर्वांक याचा खास सत्कार ओम गणेश निवासस्थानी केला. यावेळी दुर्वांकचे कौतुक करताना भविष्यात अशाच प्रकारचे सातत्य ठेवत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्या प्रयत्न कर,  यासाठी लागेल ते सहकार्य आम्ही निश्चितपणे देऊ. असे सांगतानाच दुर्वांकचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे कौतुकोत्गार आम. नितेश राणे यांनी काढले.

कणकवली तालुक्यातील वागदे गावचे रहिवाशी असलेले गावडे कुटूंबीय गेल्या तीन वर्षापासून नोकरी निमित्ताने कोल्हापूर येथे स्थायिक झाले आहेत. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) परिचारिका असणाऱ्या आई वंदना गावडे व खासगीवाहक असणारे वडील गुरुदत्त गावडे यांचे प्रोत्साहव दुर्वांकला मिळाले असून दुर्वांकने इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. आज सकाळी दुर्वांक हा आपल्या आई वडिलांसोबत वागदे येथिल आपल्या घरी आला असतानाच दुर्वांकच्या त्या विक्रमाची नोंद घेत कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी खास आपल्या निवासस्थानी बोलावून घेत त्याचा सत्कार केला.

यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, प.स. सदस्य तथा भाजप कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वागदे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर, रविंद्र गावडे यांच्यासह दुर्वांकचे आई वडील उपस्थित होते. आम. नितेश राणे यांनी दुर्वांकचे कौतुक करताना एवढ्या लहान वयात दुर्वांकने जागतिक विक्रम करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून यापुढच्या काळातही त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असून त्याने असेच यश मिळवत रहावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा