सावंतवाडा जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्यासाठी पालकांचा आक्रोश;
१५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील सावंतवाडा येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता अद्याप खुला न झाल्यामुळे पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू असून, अनेक लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने पाहणी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
या अपुऱ्या सोयीमुळे अनेक पालकांनी मुलांना इतरत्र शाळांमध्ये दाखल केले असून, त्यामुळे शाळेची पटसंख्या घटली आहे. या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सलोनी म्हावळणकर, तसेच इतर पालक आणि ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करून १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
निवेदनात सांगण्यात आले आहे की, शाळेची स्थापना 1992 मध्ये झाली असली तरी अद्याप शाळेकडे जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही आणि शाळेची जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्यात आलेली नाही. या समस्येकडे पालकमंत्री नितेश राणे आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
रस्ता खुला करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित ये-जा सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
