You are currently viewing नागोबा

नागोबा

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट: २४*

 

*नागोबा*

 

आज नागपंचमी होती, त्यामुळे काकल्या थोडा उशिरा आला. आल्या आल्या त्याने प्रश्न विचारलाच, “काय नागोबा पूजलंस?” मी म्हटलं, “हो. तू नाही पुजलांस?”

“पुजूकच होय काय?” काकल्याने तिरकस विचारलेच.

“असं काही नाही, परंतु आपण परंपरेप्रमाणे पुजतो. परंपरा पाळावी.” मी शांतपणे म्हणालो.

“पून परंपरा कित्याक निर्माण झाली? कायतरी कारण आसतलाच मां?” काकल्याने पुढचा प्रश्न विचारला.

” हे बघ. आपण नाग, बाळकृष्ण, गणपती पुजतो, म्हणजे एकप्रकारे मातीची पूजा करतो. पृथ्वीतत्वाची पूजा करतो.” मी काकल्याला समजावू लागलो.

“पून नागोबाच कित्या? मातयेच्ये वाघ, शिंव नको कित्याक?” काकल्या चाळवला.

“अरे हे बघ. आता भातशेती वर आलीय. त्यात दाणे तयार होतील. अशावेळेस उंदीर या सगळ्याची नासधूस करतात. त्याला मारणारे कोण? तर साप, म्हणून आपण सापाची पूजा करतो.”

“दिवडाची नको कित्याक?” काकल्या फॉर्मात येत होता. (धामणला आम्ही कोकणात दिवड म्हणतो.)

“हे बघ काकल्या. दिवड पण आपल्याला मदत करतो; परंतु पूजनासाठी प्रतीक आकर्षक असावं म्हणून नागाचा विचार केला असेल पूर्वजांनी. प्रश्न विचारीत बसण्यापेक्षा नागोबा पूजला असतास, तर बरं झालं नसतं का?”

“मी पुजूनच इलय. नायतर तो फाॅस करीत. तरीय माका आजून याक सांग. निवेदाक पातोळे कित्याक?खयचो सोरोप पातोळे खाता?” काकल्याने मिशीत हसत विचारले. आम्ही कोकणात पातोळे नावाचा एक स्वादिष्ट पदार्थ नागपंचमी दिवशी करतो. मी काकल्याला म्हटले, “अरे तांदूळ आणि नारळ हे इथे पिकतात. त्यापासूनच वेगवेगळे पदार्थ इथे आपण करतो. त्यात हळदीच्या पानांमुळे पातोळ्यांना एक प्रकारचा चांगला स्वाद येतो. अधिकाधिक चांगलं करण्याचे हेतूने पूर्वजांनी हे शोधलं असेल.” हे ऐकून काकल्या थोडा गप्प झाला. मी म्हटलं, “पटलं नाही का रे तुला?” तर म्हणतो, “नाय रे. समजान घेतंय. फाल्या नातवान इचारल्यान् तर सांगाक गावात. निसता शाळेत जावन घोकंपट्टी करण्यापेक्षा ह्या समजान घेतला, तर फुडे तो चलयतलो. परंपरा टिकतले. नायतर कुदाक गावता ते दांडीया आणि सोरो खावन् गाळी घालूक गावतत तो शिगमो हे दोनच सण शिल्लक रवतले. ”

काकल्या मुद्द्याचं बोलला. आमच्या नागोबाला पाया पडला आणि पत्नीने दिलेला शेंगदाण्याच्या कुटाचा लाडू खाऊन चालू पडला. अशा जाड्याभरड्या माणसातच कोकण सामावलेलं आहे, शिल्लक आहे असं मला मनोमन वाटतं.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा