You are currently viewing माहेरातील लहानपणीची नागपंचमी:- ✒️प्रा डॉ.कल्पना राजीव मोहिते

माहेरातील लहानपणीची नागपंचमी:- ✒️प्रा डॉ.कल्पना राजीव मोहिते

*(इतिहास विभाग प्रमुख यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, इस्लामपूर सेनि.)*

 

विविधतेने नटलेल्या आमच्या भारतात विवीध प्रांतात विवीध सणवार, उत्सव अत्यंत श्रध्देने साजरे केले जातात.अलीकडच्या काळात काही गोष्टी मागे पडत चालल्या.कालबाह्य झाल्या असे वाटते.माझ्या लहानपणीची माहेरातील माझी नागपंचमी मला दरवर्षी आठवणीत घेऊन जाते.महाराष्र्टातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे-बोरगाव माझे माहेर.घरोघरी सणवार उत्साहाने साजरे केले जायचे.

श्रावणात शेतात पिके उगवून धरती सगळीकडे हिरवाईने नटलेली ,श्रावणात पावसाची रिमझिम, वातावरण कसे उत्साहीत, आनंदी, प्रफुल्लीत असायचे. नागपंचमीच्या सणाला मुलींमध्ये तर खूप उत्साह असायचा.नवविवाहीता नागपंचमीच्या सणाला माहेरी आलेल्या असायच्या.नागपंचमी पासुन भगिंनीचे झिम्माफुगडी खेळ सुरु होतात ते गौरी पर्यंत रोज खेळले जायचे.

नागपंचमीला मातीचा मोठा नागोबा घरी आणला जायचा.

आमच्या घरी मोठा मातीचा नागोबा आणि छोटे दोन नागोबा निवृत्ती मामा आणून द्यायचे.मातीच्या नागोबाची पुजा केली जायची.शिवाय घरोघरी मातीच्या भिंती सारवुन नागोबा काढला जायचा.आमच्या घरी नागोबा भिंतीवर काढण्याचे ( चितारण्याचे) काम माझ्याकडे असायचे.माझी चित्रकला फार चांगली नव्हती पण घरातील मोठी मुलगी म्हणुन ते काम माझ्याकडेच यायचे.चुना,काव,देवघरातील गंधगोळी,कोळसा वापरुन रंग तयार केले जायचे.भिंत मातीने सारवून चौकोनी पाट तयार करुन घेतला जायचा.त्यात परत चार चौकोन काढून नाग काढला जायचा.वरती नागाची फडी व चार चौकोनातून त्याचे अंग,शेपटी काढली जायची .खालच्या बाजुला छोटेछोटे नाग काढले जायचे त्यांना नागाची पिल्ली म्हणटले जायचे. लक्ष्मी ,बाहुल्या काढल्या जायच्या. जवळजवळ हे सगळे काढायला दोन तास जायचे.

तोपर्यंत आईचा नैवेद्य तयार असायचा.आमच्याकडे ओल्या नारळाचे कानवले त्याचबरोबर पुरणाचे कानवले हा नागोबाला नैवेद्य त्याबरोबरच कणकेची फळे, दुध तुप, भात ,भाजी,आमटी हे असायचे.काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्यही करायचे.

कानवल्याचा नैवेद्य नागोबाला दाखवून आम्ही मैत्रिणी दिवसभर झोपाळे, झिग खेळायला,कडीपाटावर बसायला जात होतो.

श्रावणाची रिमझिम सुरु असायची.सगळीकडे हिरवेगार.

आमच्या गावात कृष्णा नदीच्या काठावर महादेवांचे मंदिर आहे.तिथे मोकळ्या जागेत मोठा झोपाळा बांधलेला असायचा.त्यावर बसायला नंबर असायचे. झोपाळा एक बसणारे खूप जण असायचे त्यामुळे नंबर लावूनच बसावं लागायचं. मोठ्या सोलाने म्हणजे (दोर) झोपाळा झाडाला बांधलेला असायचा.तो उंचउंच चढवणे म्हणजे खुप ताकद लावुन झोपाळा वरती चढवायला लागे.

आम्ही मैत्रिणी मधु,मीना ,रेखा,अरुणा,अंजना माझी बहीण आशा,सगळ्याजणी श्रावणाच्या रिमझिम पावसांच्या सरीत भिजत सगळीकडे झोपाळ्यावर बसायला जायचो. काही ठिकाणीच झोपाळे बांधलेले असायचे.आम्ही दोन-तीन ठिकाणी जात होतो. काही घरातून लहान मुलांना पण छोटे झोपाळे बांधलेले असायचे.

माझी मैत्रीण मधूच्या अंगणात दरवर्षी एक मोठा झिग बांधलेला असायचा झिगावर बसणे म्हणजे एक मोठे धाडसच. खूप भीती वाटायची . झिग खुप जोरात फिरवला कि डोळे घट्ट मिठून आम्ही भीतीने मी व मधु ओरडून झिग थांबवायला लावत असे . मीना आणि आशा खूप धाडसी त्या किती पण जोरात झिग फिरवला तरी घाबरायच्या नाहीत पण मी आणि मधु खूप घाबरत असू. झिगावरून उतरल्यावर परत क्षणभर डोळ्यापुढे काही दिसायचे नाही. झिग म्हणजे मध्ये एक लाकडी खांब जमिनीत उभा केला जायचा आणि त्याला एक वर आडवा बांबू किंवा काठी बांधून वजन तागडी सारखे काठीच्या दोन्ही साईडला दोन झोपाळेच बांधलेले असायचे. त्या दोन्ही बाजूला दोन व्यक्ती बसायच्या जोर जोरात समांतर रेषेत तो झिग फिरवला जायचा.

असे खेळताना मध्येच आम्ही घरी जाऊन कानवले खाऊन आणि परत यायचं. असा दिवसभर आमचा हा कार्यक्रम चालू असायचा.नागपंचमीचा दिवस झोपाळे ,कडीपाट झिगावर बसण्यात कधी संपायचा कळायचे नाही

माझ्या माहेरात साळुंखे मामींच्या घरी त्यांच्या घरात कडीपाट होता त्याचे सर्वाना खूप अप्रूप वाटायचे त्यांच्याकडे त्या दिवशी सर्वांना कडीपाटावर बसायला परवानगी होती‌. आज आपल्यापैकी आपल्या अनेकांच्या घरात कडीपाट आहेत पण त्याचे फारसे काही वाटत नाही पण बालपणी गावात एकमेव असणाऱ्या त्या कडीपाटावर नागपंचमीच्या दिवशी बसण्याचा आनंद काही औरच होता.

संध्याकाळी आम्ही सगळ्या जणी मिळून आमच्या अंगणात आई, आत्या, आज्जी, काकी ,वहिनीं गल्लीतील खूप जणी नागपंचमीची गाणी म्हणत असू. गौरीपर्यंत हे खेळ आमच्या अंगणात दररोज चालायचे.फेर,झिम्मा फुगडी उखाणे घालायचे.

 

“चल ग सये वारुळाला वारुळाला!

नागोबाला दूध लाह्या वाहायाला!”

 

अशी कितीतरी नागपंचमीची गाणी आजही मनात रुंजी घालतात.

आज काळ बदलला ,लोकांचं जीवन घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरायला लागलं. आज बालपण हरवते आहे असं वाटतंय. अभ्यास, ट्युशन यात छोट्यांचं बालपण कधी संपते कळतच नाही. झोपाळा चढवणे ही सुद्धा एक मोठी कला आहे. नागाची पूजा करणे म्हणजे प्राणीमात्रांविषयी प्रेम, आमच्या पूर्वजांनी निसर्ग आणि विज्ञान यांची किती सुंदर सांगड घातली आहे असे अनेक सणवार आम्ही साजरे करतो. निसर्गातल्या या आनंदाला आज अलीकडची पिढी हरवते आहे असं वाटतं .काही ठिकाणी हे असेलही. पण माझ्या माहेरातल्या प्रत्येक सणावाराच्या आठवणी मनाला खूप आनंद देऊन जातात आणि मनामध्ये त्या उंच उंच नागपंचमीच्या आठवणींचा झोका चढवत राहतात.

29/7/2025

प्रतिक्रिया व्यक्त करा