आचरा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी नगरपंचायतीचे नियोजन
निविदा प्रक्रिया पूर्ण; काम सुरू होण्यास मार्ग मोकळा
कणकवली
कणकवली नगरपंचायत हद्दीतील आचरा रोड व इतर परिसरातील खड्डे बुजवण्यासाठी नगरपंचायतने निविदा प्रसिद्ध केली आहे. मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
पावसामुळे खोळंबलेले काम आता होणार सुरू
यापूर्वी सदर काम हाती घेतले गेले होते, मात्र सततच्या पावसामुळे कामात अडथळा निर्माण झाला होता. आता पावसाचा जोर कमी झाल्याने आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने कामास प्रारंभ करण्याची तयारी सुरू आहे.
दोन दिवस वाहतूक वळवली जाणार
आचरा रस्ता हा मुख्य वर्दळीचा मार्ग असल्यामुळे वाहतूक पोलीस प्रशासनाच्या मदतीने दुसऱ्या मार्गाने वळवण्यात येणार आहे. काही वेळा रात्री उशिरा देखील काम केली जातील, अशी माहितीही मुख्याधिकारी पाटील यांनी दिली.
नागरिकांनी सहकार्य करावे – मुख्याधिकारी पाटील यांचे आवाहन
रस्त्याच्या दुरुस्तीमुळे होणाऱ्या वाहतूक बदलांची नागरिकांनी नोंद घ्यावी व नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीम. गौरी पाटील यांनी केले आहे.
