झाराप-पत्रादेवी बायपासवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार खाईत कोसळून गंभीर जखमी
सावंतवाडी
झाराप-पत्रादेवी बायपासवरील मळगाव बादेवाडी पुलावर खड्ड्यांमुळे आणखी एक जीवघेणा अपघात घडला. शनिवारी रात्री ९ वाजता गोव्यातून कामावरून परतणाऱ्या राकेश महादेव साळुंखे (२९, रा. माड्याचीवाडी, कुडाळ) यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकीने जोरदार धडक दिली. धडकेनंतर राकेश हे दुचाकीसह रस्त्यालगत असलेल्या ओहोळात कोसळले आणि गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती श्यामसुंदर सातार्डेकर यांनी आजूबाजूच्या लोकांना दिली. स्थानिक ग्रामस्थ संजय जोशी, बबन नाईक यांनी खाली उतरून राकेश यांना वर काढले. यामध्ये मळगावचे सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
रुग्णवाहिका वेळेत न आल्याने अखेर खाजगी वाहनातून राकेश साळुंखे यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या ठिकाणी पुलावर मोठ्या खड्ड्यांमुळे राकेश यांनी दुचाकीचा वेग कमी केला होता, त्याच क्षणी पाठीमागून आलेल्या वाहनाने धडक दिली. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून, उशिरापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.
मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदाराकडे वेळोवेळी खड्ड्यांसंदर्भात तक्रारी करूनही दखल न घेतल्याचा आरोप केला. पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांची जबाबदारी यंत्रणांनी घेतली पाहिजे, अन्यथा पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
