You are currently viewing फोंडाघाटच्या मनस्या फालेचा सुवर्णवेध! राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत ऐतिहासिक यश; आता राष्ट्रीय स्तरावर झेप

फोंडाघाटच्या मनस्या फालेचा सुवर्णवेध! राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत ऐतिहासिक यश; आता राष्ट्रीय स्तरावर झेप

फोंडाघाटच्या मनस्या फालेचा सुवर्णवेध! राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत ऐतिहासिक यश; आता राष्ट्रीय स्तरावर झेप

फोंडाघाट
न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या इयत्ता नववीमधील कु. मनस्या निलेश फाले हिने अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प (AITSC) सर्व्हिस शूटिंग (फायरिंग) स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. या उल्लेखनीय यशामुळे फोंडाघाटसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

सामान्य परिस्थिती, असामान्य जिद्द!
मनस्या हिच्या यशामागे परिस्थितीशी झगडणारी पार्श्वभूमी, वडिलांचे भाजी विक्रेते असलेले काम, घरात शैक्षणिक वातावरणाचा अभाव असूनही मनस्या हिने जिद्द, मेहनत, आणि मार्गदर्शकांवर ठेवलेला विश्वास यांच्या जोरावर हे यश संपादन केले. ओरस येथे पार पडलेल्या निवड प्रक्रियेतून तिने पाच जिल्ह्यांतील स्पर्धकांमध्ये बाजी मारत कोल्हापूर कॅम्पमध्ये प्रवेश मिळवला, आणि त्यानंतर अमरावतीत सुवर्णवेध घेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.

मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान
या यशात ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गचे सीईओ दीपक दयाळ शर्मा, ए.ओ. कर्नल तनुज डी. मंडलिक, सुभेदार मेजर कुलदीपकर सुधाकर, तसेच आर्या भोगले, एम.डी. लाड, अजिंक्य पोफळे यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेचा आणि जिल्ह्याचा गौरव
मनस्या फालेच्या या यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट या प्रशालेने प्रथमच राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली असून, शाळेचे मुख्याध्यापक पी. के. पारकर व संपूर्ण शिक्षकवृंद, कर्मचारी, व शाळा व्यवस्थापन समितीने मनस्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेरणादायी ठरलेले यश
या यशामुळे सिंधुदुर्गातीलच आंबोली पब्लिक स्कूलच्या संस्कार धुरी या विद्यार्थ्यानेही सुवर्णपदक मिळवले असून, त्याचे प्रशिक्षक निखिल तेली हे देखील न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे माजी विद्यार्थी आहेत हे विशेष!

मनस्या फालेचे यश हा संपूर्ण कोकणासाठी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा