*मराठी भाषेतील सौंदर्यस्थळांमुळे निर्माण झाली विद्यार्थिनींमध्ये भाषेची आत्मीयता*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मराठी विभाग आणि बॅफी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष कला शाखा, प्रथम वर्ष बॅफी आणि प्रथम वर्ष बी.कॉमच्या विद्यार्थिनींसाठी मराठी भाषेवरील गोडी वाढवण्याच्या उद्देशाने एक विशेष व्याख्यान दिनांक २३ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्रा. जगदीश संसारे होते. भाषेवरील सक्तीपेक्षा भक्ती निर्माण होणे अधिक महत्त्वाचे आहे, हे सांगताना त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीत विद्यार्थिनींना भाषेतील सौंदर्यस्थळांची सैर घडवली.
प्रा. संसारे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कोणत्याही भाषेची सक्ती महत्त्वाची नसते, तर त्या भाषेवर भक्ती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी त्या-त्या भाषेतील सौंदर्यस्थळे शोधून काढून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजेत.” त्यांनी भाषेतील लालित्य, गोडी आणि अभिव्यक्तीची ताकद विविध उदाहरणांच्या माध्यमातून उलगडून दाखवली. त्यांच्या सुस्पष्ट उदाहरणांनी आणि ओघवत्या मांडणीनं उपस्थित विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषेबद्दलचा अभिमान आणि आत्मीयता जागृत झाली.
सदर व्याख्यानाला दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. व्याख्यानाचा प्रभाव इतका होता की शेवटी “येरे येरे पावसा तुला देतो पैसा” हे बालगीतमय गाणं सर्वांनी एकत्र गायले. विद्यार्थिनींनी आनंदाने सहभाग घेतल्याचा हा क्षण म्हणजेच या व्याख्यानाचे खरे यश म्हणावे लागेल. विद्यार्थिनींमध्ये भाषेची गोडी निर्माण होणे, हीच या उपक्रमाची सर्वात मोठी फलश्रुती ठरली.

