रास्तभाव धान्य दुकान परवाना मंजुरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या परिपत्रका अन्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खाली नमूद गावांसाठी केवळ रास्तभाव धान्य दुकान परवाने मंजुरीसाठी दिनांक १ जुलै २०२५ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जाहीरनाम्यानुसार दर्शविलेल्या प्राथम्यक्रमानुसार त्या गावातील, क्षेत्रातील पंचायत, बचत गट, सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलै २०२५ पर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.
या जाहीरनाम्यानुसार, सावंतवाडी, कुडाळ, मालवण व देवगड या तालुक्यातील काही गावांमध्ये नव्याने रास्तभाव धान्य दुकाने परवाना मंजूर करण्यात येणार आहेत. सावंतवाडी तालुक्यात केसरी, सावंतवाडी ई वॉर्ड, सावंतवाडी ई १ वॉर्ड, कोंडुरा, तर कुडाळ तालुक्यात कविलगांव, रुमडगांव, कुडाळ नं.१, तसेच मालवण तालुक्यात बांदीवडे, आबेरी, गोठणे, खरारे, ओवळीये, खोटले, तारकर्ली, आणि देवगड तालुक्यात विरवाडी, वाडातर, पाटगांव, पेंढरी, नाद, गढीताम्हाणे, हडपीड, सांडवे, कट्टा, दाभोळे, लिंगडाळ, वानिवडे, ही गावे रास्तभाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची आहेत. दोडामार्ग, वेंगुर्ला, कणकवली आणि वैभववाडी तालुके निरंक आहेत.
रास्त भाव धान्य दुकाने मंजुरीसाठी प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे :१) पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), २) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, ३) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, ४) संस्थानोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास . वरील प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर होणाऱ्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायांव्दारे करु शकणाऱ्या संस्थांचीच निवड करणे आवश्यक राहील.
