You are currently viewing आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आला श्रावण श्रावण*

 

मनमोही सर सांगत आली आला श्रावण आला

चैतन्याची लहर पसरली जीव प्रफुल्लित झाला ||

 

प्राजक्त कसा बहरुन आला सडा अंगणी पडतो

शुभ्र फुलांचा देठ केशरी रांगोळीसम दिसतो ||

 

इंद्रधनु नभी निसर्ग किमया मनोहर अशी घडते

आनंदाने मयुरपंख ते तालावरती झुलते ||

 

सणासुदीच्या पूजेस्तव ही फुले सुगंधी फुलली

दुर्वापत्री रांगोळ्यांनी आरास अशी सजली ||

 

भावभक्तिने श्रावण येता व्रतवैकल्ये घडती

कहाणीतुनी प्रबोधनाचे मार्ग अनोखे वदती ||

 

श्रावण म्हणजे नातीगोती मेळ प्रितीचा असतो

निसर्ग मानव नाते सुंदर बंध घट्ट तो करतो ||

 

श्रावणात या हिंदोळ्यावर मन माझेही झुलते

माहेराला मैत्रिणींसवे खेळ खेळुनी रमते ||

 

*ज्योत्स्ना तानवडे.पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा