लोकांच्या जीविताशी खेळ
विशेष संपादकीय…..
आजगाव वाघबिळ येथे काल संध्याकाळी झालेल्या डंपर आणि दुचाकींच्या अपघातामुळे रेडी बंदराकडे खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरांच्या वेगात आणि नशेत गाडी हाकण्यामुळे डंपर वाहतुकीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कळणे येथून मळगाव मार्गे रेडी येथे होणारी लोह खनिज वाहतूक डंपर मधून गेली काही वर्षे सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणावर डंपरच्या धंद्यातून पैसे मिळतात या आशेवर अनेकांनी डंपर घेतले. परंतु त्यानंतर व्यवसाय कमी झाले, आणि डंपरांच्या कर्जाची रक्कम वाढत गेल्याने दिवसाला निदान दोन ट्रिप मिळाव्यात म्हणून डंपर मालक ड्राइवरना जास्त पैसे, दारू सुद्धा पुरवतात. त्यामुळे नंबर लावण्याच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे थकवा येऊ नये यासाठी अनेक ड्राइवर दारूची नशा करून रस्त्याने भरधाव वेगात डंपर हाकतात.
पैशांच्या आशेवर वेगात, नशेत डंपर हाकणारे ड्राइवर कधीही रस्त्यावरील पादचाऱ्यांचा अथवा छोट्या वाहनांचा विचार देखील करत नाहीत. डंपरचा हौदा उंच आणि सुरक्षित असल्याने डंपरांच्या अपघातात ड्राइवरला नुकसान पोचण्याची शक्यता नसतेच, त्यामुळे बिनधास्तपणे हे डंपर ड्राइवर समोरून येणाऱ्या वाहनांना हुलकावणी देत, प्रसंगी धक्का देत वाहतूक करतात. त्यामुळे अनेकदा डंपर अपघातात छोट्या वाहन धारकांना, पादचाऱ्यांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे. काहींना जायबंदी होत घरात बसावे लागते, तर काहीवेळा समोरील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, परंतु डंपर चालकांना अथवा मालकांना त्याचे सोयरसुतक नसते. कोर्टात केस होते, आणि त्याचा निकाल लागेपर्यंत बराच कालावधी निघून जातो, पुढे कधीतरी हे वाहक निर्दोष सुटतात. परंतु एखाद्या घरातील कर्ता पुरुष, स्त्री, मुलगा मात्र कायमचाच जग सोडून जातो.
कालच आजगाव येथे घडलेल्या अपघातात दारूच्या नशेत डंपर चालकाने एस टी गाडी, आणि तीन दुचाकींना ठोकरले. या अपघातात रेवाडकर दाम्पत्य मृत्युमुखी पडले, त्यात मधुमती रेवाडकर जागीच गतप्राण झाल्या आणि पती मधुकर रेवाडकर हे हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेत मरण पावले तर इतर तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अपघातानंतर डंपर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु स्थानिक युवकांनी पाठलाग करून त्याला मळेवाडच्या दिशेने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
दारूच्या नशेत असणारे हे ड्राइवर सांगतात की, नशा नाही तर आपण डंपर चालवू शकत नाहीत. न्हावेली येथेही असाच डंपर ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखत अद्दल घडवली होती. परंतु त्यानंतर पुन्हा वेगात नशेत गाड्या हाकण्याचे प्रकार सुरू झाले.
राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी याविषयावर कधी भाष्य करत नाहीत किव्हा आंदोलन करत नाहीत ते का? हा मात्र संशोधनाचा विषय आहे. पोलीस, आरटीओ अधिकारी देखील या बेदरकार वाहतुकीबाबत मूग गिळून गप्प असतात. रस्त्याने नियमात वाहतूक करणार्यांना थांबवून त्यांची चौकशी करणारे हे अधिकारी अशा बेदरकार नशेत होणाऱ्या वाहतुकीवर कधी कारवाई करणार आहेत? की ते लोकांचे जाणारे जिवंच पाहणार आहेत? हे प्रश्न मात्र निवृत्तरच आहेत.