सिंधुदुर्ग :
कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वे मार्ग दृष्टिक्षेपात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात त्यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. कोकण रेल्वे मार्गावरती गणेशोत्सवात जादा गाड्या सोडाव्यात, महत्त्वाच्या थांब्यावरती थांबे मिळावेत व आरक्षण सुरळीत व्हावे यासाठी भेट घेऊन पत्र दिले आहे. यावेळी या नव्या रेल्वे मार्गासाठीही राणे यांनी पत्र दिल आहे. या नव्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणारा थेट नवा रेल्वे मार्ग दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता बळावली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची खासदार नारायण राणे यांनी भेट घेतली व यावेळी झालेल्या चर्चेत कोकणाबाबत रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. कोकणातील उद्योगाला चालना मिळावी, थेट पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी रेल्वेने जोडला जावा, येथील मत्स्य उद्योगालाही नव्याने चालना मिळावी यासाठी हा रेल्वे मार्ग गेले कित्येक वर्षे प्रस्तावित आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास प्रवासाबरोबरच नवीन औद्योगिक क्षेत्राला ही चालना मिळणार आहे. जलमार्गे इम्पोर्ट एक्स्पोर्ट या औद्योगिक धोरणालाही नव्याने बळ मिळू शकते. यामुळे कोकणातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यासाठी खासदार नारायण राणे यांनी पाठपुरावा सुरू केला असून याला आता यश येण्याची शक्यता आहे.
