You are currently viewing २७ जुलै रोजी कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

२७ जुलै रोजी कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि २७ जुलै २०२५ रोजी कुडाळ मालवण तालुक्यात विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यातून मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत कुडाळ येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जी. टी. राणे यांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीअंती ज्या नागरिकांना एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी करण्याची आवश्यकता आहे त्यांना कुडाळ येथील राणे हॉस्पिटल मध्ये हि सेवा मोफत दिली जाणार आहे. या शिबिराचा मालवण मधील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी केले आहे.

तसेच कुडाळ तालुका युवासेना, शिवसेना यांच्या वतीने आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने कुडाळ शिवसेना शाखा येथे रविवार दि २७ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे. त्याचबरोबर उद्धवजींच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी माणगाव येथील दत्तमंदिर येथे सकाळी ९ वाजता माणगाव शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने अभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा