You are currently viewing कुडाळमध्ये खासगी रुग्णालयाच्या जनरेटरला आग…

कुडाळमध्ये खासगी रुग्णालयाच्या जनरेटरला आग…

कुडाळमध्ये खासगी रुग्णालयाच्या जनरेटरला आग; वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला

कुडाळ

कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौकात असलेल्या एका खासगी रुग्णालयाच्या जनरेटरमध्ये सोमवारी सायंकाळी अचानक धुराचे लोट दिसू लागल्याने खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे लागलेली ही आग वेळीच नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

ही घटना सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. जनरेटर रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला होता व लाईट नसल्यामुळे सुरू करण्यात आला होता. अचानक धूर येत असल्याचे लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी तात्काळ सिलेंडरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून एमआयडीसी व कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागालाही तत्काळ पाचारण करण्यात आले. दोन्ही अग्निशमन बंब काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसीच्या पथकाने जनरेटर परिसरात पाणी फवारून आग पूर्णतः विझल्याची खात्री करून घेतली.

या घटनेमुळे काही काळ परिसरात तारांबळ उडाली होती आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाच्या व रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे धोका टळला.

प्रतिक्रिया व्यक्त करा