“नापणे धबधब्याला ‘शेर्पे-नापणे धबधबा’ असे अधिकृत नाव द्या” – शेर्पे ग्रामपंचायतीची पालकमंत्र्यांकडे मागणी
कणकवली
कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध नापणे धबधब्याला “शेर्पे-नापणे धबधबा” असे अधिकृत नाव द्यावे, अशी मागणी शेर्पे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच स्मिता पांचाळ यांनी दिली.
निवेदनात नमूद केले आहे की, हा धबधबा केवळ ‘नापणे धबधबा’ नाही, तर पारंपरिक व स्थानिक ओळखीनुसार त्याचे नाव “शेर्पे-नापणे धबधबा” असेच आहे. कारण सदर धबधबा संपूर्णतः शेर्पे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येतो. धबधब्याचा मार्ग, आजूबाजूची जमीन, बांधकामे, हॉटेल्स व इतर सुविधा या सर्व शेर्पेच्या हद्दीत असून, पर्यटकांना देखील शेर्पे ग्रामपंचायतीच्या हद्दीतूनच ये-जा करावी लागते. स्थानिक करदेखील शेर्पे ग्रामपंचायतीकडे भरले जातात.
शासनामार्फत अलीकडेच धबधब्यावर उभारण्यात आलेल्या काच पुलाला “नापणे धबधबा” असे नाव देण्यात आले आहे, मात्र यामध्ये “शेर्पे” गावाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या भूमिकेनुसार हा अन्यायकारक निर्णय असून, गावाचा ऐतिहासिक व भौगोलिक अधिकार कायम ठेवण्यासाठी धबधब्याला “शेर्पे-नापणे धबधबा” असेच अधिकृत नाव देण्यात यावे, अशी नम्र मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

