“ग्रामविकासाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या कर्मयोग्याची ग्रेट भेट”…ॲड. नकुल पार्सेकर..
सावंतवाडी
एम्. आय् टी. पुणे आणि राष्ट्रीय सरपंच संसद परिषद यांच्या सहकार्याने आणि एम्. आय्. टि. चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुलजी कराड यांच्या संकल्पनेतून श्री तिर्थक्षेत्र आळंदी येथे दोन दिवसाच्या वारकरी संप्रदायातील जेष्ठ वारकरी व किर्तनकार यांची गोलमेज परिषद आयोजित केलेली होती. ज्या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील वारकरी व किर्तनकार यांच्याशी निगडीत विविध विषयांवरचे परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये संगणक निर्माते डॉ. विजय भाटकर, चाणक्य मंडळाचे निवृत्त सनदी अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र साहित्यिक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद मोरे, आणि आदर्श ग्रामविकासाचा उत्तम नमुना म्हणून संपूर्ण देशात ज्याचा गवगवा होत आहे त्या हिरवे गावाच्या सर्वागीण विकासाचे शिल्पकार पद्मश्री मा. पोपटराव पवार यांचे विचार ऐकण्याची सुवर्ण संधी मिळाली.
दहा वर्षापूर्वी शाश्वत ग्रामविकास या विषयावर पुण्यातच त्यांचे संबोधन ऐकले होते. त्यानंतर चार वर्षापूर्वी अहमदनगर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माझे मार्गदर्शक, “स्नेह”या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात प्रभावी काम करणारे डॉ. राहुल कुलकर्णी यांच्या संस्थेमार्फत” आझादी का अमृत महोत्सव “मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. त्यावेळी माझी जेष्ठ कन्या सौ. स्नेहल हिला “स्नेह” या संस्थेने भरतनाट्यमच्या सादरीकरणासाठी निमंत्रित केले होते तेव्हा मा. पोपटराव पवारांची भेट झाली होती. काही विषयावर चर्चा पण झाली होती आणि काल पुन्हा एकदा ग्रामविकासासाठी अविरत, अखंडपणे झटणाऱ्या आणि आदर्श ग्रामविकास कसा करावा? याचे मार्गदर्शन करणाऱ्या मा. पोपटराव पवारांची ग्रेट भेट आळंदीत झाली. या वारकरी, किर्तनकार गोलमेज परिषदेचे मुख्य संयोजक मा. डॉ राहुलजी कराड आणि राष्ट्रीय संसद सरपंच परिषदेचे मुख्य समन्वयक मा. योगेश पाटील यांच्यामुळेच मला ही संधी मिळाली. माझ्या सोबत राष्ट्रीय संसद सरपंच परिषदेचे कोकण विभागाचे अध्यक्ष श्री संतोष राणे व सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक व सत्यार्थ महाराष्ट्र या न्यूज चॅनेलचे संपादक प्रा. रूपेश पाटील हे सुद्धा उपस्थित होते. श्री योगेश पाटील, श्री महाले आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी मा. डॉ. राहुलजी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन दिवसाची गोलमेज परिषद यशस्वीपणे पार पडली.

