*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तू रिमझिम रिमझिम ये ना..*
गडगड खडखड येणे पावसा आवडते मज फार
तुझा अवेळी असा बोभाटा उघडे आहे रे दार…
तू रिमझिम रिमझिम ये ना
तुझी सोबत आण ना सेना
भेर तुताऱ्या डमरू झांजर वाजवित धिंगाणा
काळ्या ढगांच्या तुझ्या पालख्या वाऱ्यावरती स्वार…
तुझा अबलख आहे घोडा
पायी छनछन वाजे तोडा
हवेवरी तो उधळत वारू सुसाट लववी माड
सारी पन्हाळे ओसांडून रे तुझी ती संतत धार…
दुथडी त्या नद्या नि नाले
दंवबिंदू नि गवती भाले
हिरवाईचा अंमल सारा धरा दिसे अनमोल
पाचूने ती नटते काया वसुंधरा गारेगार…
बरकत बरकत तुझे हे येणे
फुलवित ये तू उद्याने
लक्षदीप घेऊन नाचतो कुंजवनी मनमोर…
येरे पावसा बोलविते ते पावसाचे पोर..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

